आवक सुरू : शेतकऱ्यांची लगबग
कोगनोळी : येथील विनोद पाटील या शेतकऱ्याचा तंबाखूला 133 रुपये दर व्यापाऱ्यांनी केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यापाऱ्यांच्या कडून तंबाखू खरेदी सौदे झाले. चालू वर्षी तंबाखू दर प्रति किलो 110 रुपये पासून 133 रुपये पर्यंत झाला आहे. येथे सुमारे 100 बोध तंबाखू खरेदी झाली.
तंबाखू पिकाला मिळणारा दर व पीक घेण्यासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने तंबाखू पीक कमी झाले आहे. एकेकाळी कोगनोळी गाव हे तंबाखू उत्पादक गाव म्हणून ओळखले जायचे. गावातील शेतकऱ्यांचे मुख्य आर्थिक पीक म्हणून तंबाखू या पिकाकडे पाहिले जात होते. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये तंबाखूला मिळणारा दर कमी असून उत्पादनासाठी खर्च जास्त येत असल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळाले आहेत.
पंचक्रोशीला वरदान ठरलेल्या दूधगंगा नदीला बारमाही पाणी असल्याने या भागात तंबाखू पिका ऐवजी ऊस पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
तंबाखू पिकाला खर्च व कष्ट जास्त असल्याने व या पिकावर पडणारा किडीचा प्रादुर्भाव यामुळे हे पीक हाताला लागेल की नाही याची खात्री देता येत नाही. त्याचबरोबर निसर्गाचा कोप कापणीच्या वेळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या सर्व गोष्टीमुळे शेतकरी तंबाखू पिक कमी करून ऊस पिकाकडे वळाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta