वीरूपाक्षलिंग समाधी मठात मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात लहान मुलांसह युवकांमध्ये वाचनाची आवड कमी होत आहे. त्यामुळे पुरेसे ज्ञान मिळणे कठीण झाले आहे. परिपूर्ण ज्ञानासाठी मुलांना लहान पणापासूनच वाचनाची आवड असली पाहिजे. वाचनामुळे भरपूर ज्ञान मिळून मक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन पन्हाळा तालुक्यातील मुख्याध्यापक दत्तात्रय लवटे यांनी केले. येथील वीरूपाक्षलिंग समाधी मठात विद्यार्थ्यांसाठी आयोजित उन्हाळी शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाधी मठाचे मठाधीश प्राणलिंग स्वामी होते.
मुख्याध्यापक लवटे म्हणाले, गोबल वार्मिंग रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे. आपल्या आईवडिल आणि गुरुजनां मुळे आपली प्रगती होत असल्याने त्यांचा नेहमी आदर राखला पाहिजे. मुलांनी संभाषण कौशल्य आत्मसात करून विचारांसह ज्ञानाची देवाणघेवाण केली पाहिजे. आपल्या कुटुंबासह समाजासाठी कार्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्याकडील ज्ञानाचा इतरानाही उपयोग झाला पाहिजे. समाजातील सर्वसामान्य आणि हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याची गरज आहे. चांगल्या मार्गदर्शनामुळे आदर्श नागरीक तयार होऊन तेच देशाचे उज्वल भवितव्य ठरवतील.
निवृत्त मुख्याध्यापक आर. बी. रामनकट्टी यांनी समाधी मठात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वच उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शिबिरात ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुख्याध्यापक लवटे यांचा प्राणालिंग स्वामींच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास सुनिल जनवाडे, जे.बी. जनवाडे, दशरथ कुंभार, गजानन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta