मांगुर फाट्यावर कारवाई : संशयीतांची कारागृहात रवानगी
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाटा येथे हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना वनविभागाच्या सीआयडी पथकाने गजाआड केले. नितीश अंकुश राऊत (वय ३५, रा. पेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) व खंडू पोपट राऊत (वय ३४, रा. कुगाव ता. करमाळा जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघा संशीतांची नावे आहेत. यावेळी संशयित दोघांकडून १२ किलो वजनाचे हस्तीदंत जप्त केले. विशेष म्हणजे वर्षभरातील ही सीआयडी पथकाची तिसरी कारवाई आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, नितीश व खंडू हे महामार्गावर मांगुर फाटा येथे हस्तिदंताची तस्करी करून विक्रीसाठी थांबल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली.त्यानुसार सीआयडी विभागाचे पोलीस महासंचालक शरचंद्र के. व्ही. उपअधीक्षक मुत्ताण्णा सरवगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव सीआयडी वनविभागाच्या उपनिरीक्षिका रोहिणी पाटील यांनी महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाटा येथे सापळा रचला. यावेळी नितिश व खंडू हे दोघेजण पिशवीत हस्तिदंत घेऊन थांबल्याचे दिसून आले. यावेळी दोघांचीही चौकशी ताब्यात घेतले असता त्यांनी आपण पुणे येथून हस्तिदंताची तस्करी करून ग्राहक शोधून त्याची विक्री करण्यासाठी आल्याची कबुली दिली.
या कारवाईत पथकाचे कर्मचारी यु. आर. पटेल, के. बी. कंठी, एस. एल. नायक, एम. ए. नायक, एस. आर. अरविंची, आर. बी. कवळीकट्टी यांनी सहभाग घेतला. संशयीत दोघांवरही वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करून निपाणी न्यायालयपुढे हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही बेळगावच्या हिंडलगा कारागृहामध्ये रवानगी केल्याची माहिती उपनिरीक्षीका पाटील यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta