
स्वतः नगरपालिका आयुक्तांची उपस्थिती; टप्प्याटप्प्याने होणार स्वच्छता
निपाणी (वार्ता) : शहरातील मुख्य वस्तीत अस्वच्छतेचा बाजार पाहायला मिळत आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला असून सुध्दा शहरातील नाले व गटारांची साफसराई करण्याच्या कामाना मुहूर्त मिळालेला नव्हता. अखेर शनिवारपासून (ता.३) नगरपालिकेकडून नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे अभियंते विनायक जाधव,पर्यावरण अभियंते चंद्रकांत गुडनावर, बाळासाहेब खोत, विशाल मधाळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नगरपालिकेने उशीरा का होईना नालेसफाईचा निर्णय घेतल्याने नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास वाचला आहे.
शहरातील अनेक भागात मोठमोठे नाले बंदीस्त झाल्या असून, काहींवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे शहरातील नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण करण्याचे मोठे आव्हान नगर पालिकेच्या स्वच्छता विभागापुढे आहे.
नगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मॉन्सूनपूर्व नाले सफाई मोहिम राबवावी अशी मागणी नागरिकांतून केली जात होती. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून नाल्यांमधील केरकचरा, झाडे झुडपे काढून नाल्याचे खोलीकरण व विविध ठिकाणी बंद झालेल्या नाल्यांचे सरळीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. जेसीबीद्वारे मोठया नाल्यांची सफाई प्रभाग निहाय सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पावसाळ्यात घरात पाणी शिरणाऱ्या काटकर मळा, आंदोलननगर डवरी, गोसावी वसाहत, बादलवाले प्लॉट आणि भीमगरातील लहान मोठ्या गटारी आणि नाण्यांची स्वच्छता केली आहे. यापुढील काळात बागवान ओढा परिसर व लहान मोठ्या गटारी आणि नाल्यांची स्वच्छता केली जाणार आहे.
रस्त्यांवरील दुकानदार मात्र स्वछता मोहिमेला बिलकुल प्रतिसाद देत नाही असे नगरपालिकेचे म्हणणे आहे. काही दुकानदार वर्षभर कचरा घंटागाडीमध्ये न टाकता नालीत टाकतात. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा साचतो. ही मोठी अडचण आहे. त्यांना पालिकेने लेखी नोटीस देऊन तोंडी सुद्धा सांगितले आहे. मात्र, दुकानदारांकडून प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी रस्त्यावरील दुकानदारांनी कचरा गटारीत न टाकता घंटागाडीला देऊन सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
—————————————————————–

‘पावसाळ्याच्या पूर्वी कोंडलेल्या मोठ्या मुख्य नालीतील गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या टप्प्याटप्याने नाले सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनीही पावसाळ्यात घरातील व परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.’
– जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta