साखरवाडीतील महिला मंडळाचा उपक्रम : वटवृक्ष जतनाचा संदेश
निपाणी (वार्ता) : जून महिना आला की वेध लागतात ते मॉन्सूनच्या आगमनाचे त्याचबरोबर हिरवाईने नटणाऱ्या विविध सणांचे. याच कालावधीत निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि विविध सणांचे आवतन घेऊन येणाऱ्या वटपौर्णिमेला महिलांचे खास आकर्षण असते. ‘जन्मो जन्मी हाच पती मिळू दे’ ही भावना वडाच्या झाडाला धागा बांधताना सुवासिनींची असते. मात्र आता बदललेला काळ लक्षात घेतल्यास महिलांनी केवळ पतीसाठी नव्हे, तर कुटुंबाच्या भवितव्यासाठी ऑक्सिजन गरजेचा आहे. त्यानुसार झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनी मधील महिला मंडळांनी शनीवारी (ता.३) वटपौर्णिमा कार्यक्रम प्रसंगी केला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे शहर परिसरात कौतूक होत आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याच्या संवर्धनावर सर्वत्र चर्चा होते. आता चर्चा न करता वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी अनेक मार्गावर वडाच्या झाडांचे अस्तित्व होते. रस्ता रुंदीकरण व प्लॉटिंगमुळे बहुतांश झाडांवर कुऱहाड पडली. दरवर्षी जुलैमध्ये निपाणी तालुक्यात वृक्षारोपण अभियान शासनासह संघटनांकडून राबविले जाते. पण त्यांची वर्षभर देखभाल होत नसल्याने वृक्ष जगणे कठीण झाले आहे.
गत २ वर्षापासून कोरोनाचे थैमान सुरू असून ऑक्सिजनची कमतरता भासली. वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. अशा काळात वडाचे झाड सतत प्राणवायू सोडण्याचे काम करते. त्यामुळे गरज लक्षात घेऊन साखरवाडी युवक, महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांनी वटपौर्णिमा दिवशी पूजा झाल्यानंतर साखरवाडी मधील हौसाबाई कॉलनी परिसरात वृक्षारोपण केले. तसेच प्रत्येक महिलांनी आपल्या दारात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
यावेळी जिजाबाई राऊत, माया जाधव उमा आवळेकर, गीता आवळेकर, ज्योती निकम गीता, आवळेकर, शोभा शिंदे, राजश्री हजारे, स्वाती नेजकर, शुभांगी जाधव, संध्या सूर्यवंशी, प्रज्ञा सुतार यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————————
‘साखरवाडी परिसराला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. त्यानुसार येथील महिला मंडळांनी एकत्र येऊन वटपौर्णिमा दिवशी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. सध्या प्राणवायूची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे केवळ वडाच्या झाडाची पूजा न करता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी वटपौर्णिमेदिवशी साखरवाडी महिला मंडळातर्फे संवर्धनाची जबाबदारी महिलांनी घेतली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.’
– जिजाबाई राऊत, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta