अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे जनजागृती : विद्यार्थ्यांनी काढली गावभर रॅली
निपाणी (वार्ता) : शासनाने बंदी करूनही नागरिक अजूनही एकल वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कॅरीबॅगचा वापर सर्रासपणे करीत आहेत. त्याचा पर्यावरणावर मोठा आघात होत असून ही बाब गांभीर्याने घेऊन येथील कोडणी रोडवरील
अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षकासह विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून प्लास्टिक बाबत जनजागृती आणि पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करण्याच्या आवाहनासाठी शहरातील विविध मार्गावरून जनजागृती केली. शिवाय शहरातील अनेक व्यवसायिकांना कागदी पिशव्यांचे वाटप करून अनोखा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे निपाणी व परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रदुषण व प्लास्टिक जागृती निर्माण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, झाडे लावणे अशा विविध विषयांवर आधारित संदेश दिले. रॅलीची सुरुवात चन्नम्मा सर्कलपासून करण्यात आली. याठिकाणी ‘मुलांनी स्वहस्ताने बनविलेलेया कागदी पिशव्यांचे वाटप विविध प्रकारचे दुकान, मेडिकल दुकानात करून ‘प्लास्टिक टाळा, निसर्ग वाचवा’ असा संदेश यावेळी देण्यात आला.
येथील नगरपालिका जवळ रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी रॅलीमधील सहभागी मुलांचे कौतुक करून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. प्राचार्या चेतना चौगुले यांनी मुलांना प्रोत्साहन देत प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक शौकत मनेर, शाळेच्या समन्वयिका अर्पिता कुलकर्णी, मारुती महाजन शिक्षिका माधुरी लोळसुरे, नाझनिन होसुरी, पद्मश्री पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, डॉ. जोतिबा चौगुले, डॉ. उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta