गांधी चौकात कर तोडणीचा कार्यक्रम : कर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात सोमवारी (ता.५) विविध उपक्रमांनी बेंदूर सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यातील श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या मानाच्या बैल जोडीने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करतोडीचा कार्यक्रम झाला.
शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना सजवून गावातून मिरवणूक काढली. शिवाय गोडाधोडाचा नैवेद्य दिला. तर घरोघरी मातीच्या बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
येथील श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यामध्ये पारंपारिक पद्धतीने बेंदूर सण साजरा झाला. सणाच्या आदल्या दिवशी राजवाड्यामध्ये बैलजोडीचे आगमन झाले. त्यानंतर बैलांना खिचडा देऊन त्यांचे लोणी व हळदीने खांदे मळण्यात आले. सोमवारी (ता.५) सकाळी बैलांना हळव्या, मसाला, अंडी तेल असे पौस्टीक आहार देण्यात आला. त्यानंतर गरम पाण्याने त्यांना आंघोळ घालण्यात आली. निपाणकर घराण्याच्या सुहासिनीकडून सकाळी बैलांना ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य, गुळ, खोबरे, कांदा असे आहार खाऊ घालण्यात आले. सायंकाळी श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या हस्ते बैलांचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले. मानकरी बापूसाहेब खोत यांच्या बैलांचा मान निपाणकर राजवाड्यात देण्यात आला. उमेश खोत, मच्छिंद्र कमते, नितीन पाटील, उदय घाडगे, प्रदीप इंगवले, नामदेव नाईक, सागर कमते, सुहास इंगवले, संजय घोडके, रतन खंडाळे यांनी बैलजोडी धरण्याचा मान पटकावला. त्यानंतर येथील गांधी चौकात रचलेल्या बन्नीच्या शि-यातून बैल जोडी जाऊन कर तोडणीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सजवलेल्या बैलांची गांधी चौक, दलाल पेठ मार्गे राजवाड्यापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहर आणि उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमास निपाणकर घराण्याचे श्रीमंत विजयराजे निपाणकर, श्रीमंत शिवतेजराजे निपाणकर, श्रीमंत युवराज सिध्दोजीराजे निपाणकर, इतिहासप्रेमी नागरिक चंद्रकांत तारळे, डॉ. भारत पाटील, प्रकाश मोहिते, आप्पासाहेब यरनाळकर, युवराज पाटील, सचिन कोळी, पप्पू चव्हाण, हेमंत सासणे, अमोलसिंह भोसले, सुजितसिंह गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta