प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे संपत्ती आहे आणि ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडेच सत्ता आहे. यामध्ये सामान्य माणूस कुठे आहे? असा प्रश्न पडला आहे. परिवर्तनवादी चळवळ अस्तित्वात आहे का? हेच समजेनासे झाले आहे. चळवळीसाठी जी नैतिक ताकद लागते ती नैतिक ताकद आपण हरवून बसलो आहोत. यातून नवी उभारी घेण्याची गरज आहे. परिवर्तन हे जात किंवा धर्माच्या आधारावर होत नाही तर ते मूल्यांच्या आधारावर होते. परिवर्तनासाठी चळवळ महत्त्वाची असून आजकाल स्थिरावलेल्या चळवळीला गतिमान करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी केले.
प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या जीवनरंग या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार तसेच प्रा. डॉ. एन. डी. जत्राटकर यांना समाजशास्त्र परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यानिमित्त प्रा. डॉ. माने तसेच प्रा. डॉ. जत्राटकर यांचा परिसरातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यां तर्फे सत्कार समारंभ करण्यात आला. येथील चिकोडी रोडवरील ब्रम्हनाथ सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत गुंडे होते. प्रा. नानासाहेब जामदार यांनी स्वागत तर प्रा. एन. आय. खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी कामगार उपायुक्त सी. ए. खराडे व प्रशांत गुंडे यांच्या हस्ते प्रा. डॉ. माने, प्रा. डॉ. जत्राटकर यांचा सत्का झाला.
प्रा. डॉ. जत्राटकर म्हणाले, ज्याला पोटाची कळ कळली आहे तो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला घाबरत नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत संविधानाच्या आधारावर चालणारी देशाची व्यवस्था पुन्हा वैदिक धर्माच्या दावणीला बांधून पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे थांबवण्यासाठी अभ्यासू व्यक्तींनी पुढे येऊन परिवर्तनवादी चळवळीला नवे रूप देणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी सी. ए. खराडे, वसंत नगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रसन्नकुमार गुजर, विठ्ठल वाघमोडे, जयराम मिरजकर, प्रा. आर. के. दिवाकर, बाबासाहेब मगदूम, अस्लम शिकलगार, कबीर वराळे, सुधाकर माने, मधुकर पाटील, सुधाकर सोनाळकर, पल्लवी बेडकेहाळे, साजिदा पठाण, प्रा. शेखर कांबळे, सुनील शेवाळे, मिथुन मधाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रा. आनंद संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta