जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील; निपाणीत शांतता बैठक
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथे काही अज्ञात व्यक्तींनी आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस आणि फोटो ठेवून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा समाजकंटकावर कारवाई केली असून या पुढील काळात सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवा, असे आवाहन बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी केले. निपाणी येथे मोबाईलवर अक्षपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे बुधवारी (ता.७) काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असून त्या पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी गुरुवारी (ता.८) निपाणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक झाली. त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी वरील आवाहन केले.
संजीव पाटील म्हणाले, निपाणी शहराला चळवळी आणि शांततेचा वारसा आहे. येथे विविध जाती धर्माचे लोक बऱ्याच वर्षापासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. येथील सर्वच कार्यक्रमात जातीय सलोखा राखला जातो. आतापर्यंत कोणत्याही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कधीही तणाव झालेला नाही. किरकोळ काही समाजकंटकामुळे अशा घटना घडत असून त्याकडे दुर्लक्ष करून सर्वांनी शांततेने राहणे आवश्यक आहे. त्यापुढील काळात अशा समाजविघात घटना घडणार नाहीत. त्याकडे पोलिसांचे लक्ष असल्याचे सांगितले
चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज येलीगार यांनी, काही समाजकंटकांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तात्काळ त्यांना चौकशीसाठी बोलावून अटक केली आहे. निपाणी शहरात विविध समाजाचे लोक असूनही अजूनही शांतता आणि सलोख्याचे शहर म्हणून ओळख आहे. अशा किरकोळ काही घटना घडल्यास कुणीही कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. समाजविघातक घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. सर्वांनी शांतता बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवरांनी बैठकीत सहभाग घेऊन निपाणी शहरात अप्रिय घटना घडणार नाही याबाबत जागृत राहणार आहोत. शहरात शांतता राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून अशा घटना घडवून येत त्यासाठी सर्वांनी जागृत राहण्याचे आवाहन केले.
बैठकीस बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख विनोद गोपाल, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक विनोद पुजारी, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी सभापती सुनील पाटील, राजू गुंदेशा, नगरसेवक शेरू बडेघर, माजी नगरसेवक राज पठाण, अनिस मुल्ला, जुबेर बागवान यांच्यासह विविध समाजातील नेते मंडळी व नागरिक उपस्थित होते.