निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथील आक्षेपार्ह स्टेटसच्या घटनेमुळे दोन दिवसापासून निपाणी शहरातील वातावरण तनावग्रस्त बनले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध हिंदू संघटनांनी शुक्रवारी (ता.९) बंदची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (ता.८) सायंकाळी बैठक होऊन शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार करून शुक्रवारी (ता.९) पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे. तर सायंकाळी चार वाजता मूक मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात येणार असल्याचे विविध संघटनेच्या बैठकीत ठरवण्यात आले.
दोन दिवसापूर्वी येथील उपनगरातील काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यामुळे निपाणी परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपालिका समोर हे आंदोलन करून तात्काळ संबंधितांना अटक करण्याची मागणी केली होती. अटक न झाल्यास शुक्रवारी निपाणी बंदची हाक देण्यात आली होती.त्यानुसार या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक केली आहे.
निपाणी बंद बाबत गुरुवारी सायंकाळी विविध संघटनांची बैठक होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निपाणी बंदची हाक मागे घेतले आहे. शुक्रवारी (ता.९) सायंकाळी चार वाजता येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून यापुढे काळात अशा घटना घडू नयेत यासाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदार विजय कडगोळ यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी त्यामध्ये सगळे होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta