बोरगाव हिंदू बांधवांची मागणी : सदलगा पोलीस स्थानकास निवेदन
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरात जातीय तेढ निर्माण करून समाजाला वेठीस धरणाऱ्या त्या समाजकावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा आग्रही मागणीची निवेदन शहरातील हिंदू समाजातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदलगा पोलीस स्थानकास निवेदन देण्यात आले.
निवेदना मधील माहिती अशी, बोरगाव हे शांतता व सुव्यवस्था राखणारे शहर आहे. यापूर्वी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाज विघातक प्रवृत्ती नव्हती. शहरातील काही तरुणांनी आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून सामाजिक सलोखा भंग करण्यासह समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे. समाजकंटकांची नावे पोलिसांना माहिती आहेत. वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देऊन शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी त्या दोषींवर कारवाई करावी. यापुढे अशा घटनामुळे जातीय तेढ निर्माण होऊ नये, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. निवेदन स्वीकारून सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एच. भरतगौडा म्हणाले, सर्वधर्मिय शांतता, सौहार्दता अबाधित राहण्यासाठी सर्वच समाजाच्या नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार आक्षेपार्ह कुणीही स्टेटस ठेवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. भारत देश संत महापुरुषांचा देश आहे. सर्वांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना कोणताही भेद न करता न्याय देण्याचे काम केले आहे. अशा भूमीत जर कोणी असे स्टेटस या माध्यमातून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी बोरगाव येथील सर्व जातीचे समाज बांधव हिंदू पदाधिकारी, हिंदुत्व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta