Monday , December 8 2025
Breaking News

माजी सभापतींनी दाखवली पाण्यासाठी माणुसकी

Spread the love

 

विहिरीपासून थेट प्रभागात जलवाहिन्या; नगरसेविका गीता पाटील यांचाही पुढाकार

निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच जवाहर तलावाची पाणी पातळी खालावत गेली. गेल्या आठवड्यात पाणीसाठा संपत आल्याने आठवड्यातून एकदा शहर आणि उपनगरामध्ये पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन माजी सभापती सुनील पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका गीता पाटील यांनी विहिरीपासून जलवाहिन्या घालून थेट प्रभागात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. भर उन्हाळ्यात त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे.
येथील प्रभाग ७ मधील माणिकनगर, आमते गल्ली, जासूद गल्ली, हणबर गल्ली, महादेव गल्ली, खोत गल्ली व सासणे गल्ली येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत होती.त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी अन्यथा धावाधाव करावी ही समस्या लक्षात घेऊन यासाठी माजी सभापती सुनील पाटील व नगरसेविका गीता पाटील यांनी खासगी कूपनलिका व विहिरीचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने या भागातील नागरिकांना पाणीटंचाईची झळ कमी झाली आहे. शहरास पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहरलाल तलावातील पाणी पातळी अत्यंत खालावल्याने शहर व उपनगराला पालिकेकडून आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. प्रभाग ७ मध्ये पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी बंद पडलेली हणबर गल्ली येथील कूपनलिका सुनील पाटील यांनी स्वखचने दुरूस्त करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर कुंभार गल्ली येथील नंदकुमार शाह यांच्या कूपनलिकेचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी पालिकेकडून वीज जोडणी घेण्यात आली आहे. खोत गल्ली व सासणे गल्ली येथील नागरिकांना रवींद्र कोठीवाले यांच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. माणिकनगर व टपाल कार्यालया जवळील कुटुंबांना कुमार पाटील यांच्या कूपनलिकेचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या माणिक नगर, महादेव गल्ली, दत्त मंदिर समोर, कुंभार गल्ली व फ्रेंड्स कॉर्नर येथे असलेली कुपनलिका सुरू आहे. सदर पाणी पाईपलाईनने ठिकठिकाणी देण्यात आले आहे. प्रथमेश गणेश मंदिराचे पाणीही नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने परिसरातील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. सुनील पाटील दांपत्य, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोठीवाले आणि कुमार पाटील यांच्याप्रमाणेच शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारचे उपक्रम राबवून शहरातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्याची मागणी होत आहे.
—————————————————————–
सामाजिक कार्यात अग्रेसर
येथील महादेव गल्लीतील माजी उपनगराध्यक्ष आणि माजी सभापती सुनील पाटील हे नेहमीच धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर महादेव गल्लीत मधील युवक मंडळांच्या सहकार्याने दरवर्षी महा रक्तदान शिबिर सह विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यामुळेच त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय ठरत आहे.
—————————————————————

‘महादेव गल्ली परिसरात यंदा प्रथमच पाण्याची टंचाई जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन पत्नी नगरसेविका गीता पाटील यांच्या सहकार्याने आपण या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यासाठी परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभत आहे.’
– सुनील पाटील, माजी सभापती, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *