जे. एस. पाटील; अक्कोळ पार्श्वमती विद्यालयात बालमजूर विरोधी दिन
निपाणी (वार्ता) : भटक्या समाजातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहून बालमजुरी करीत आहेत. कुटुंबातील गरिबी हेच त्यामागचे कारण आहे. त्यामुळे पालकही शिक्षणाकडे कानाडोळा करून त्यांनाही लहानपणी मजुरीसाठी पाठवीत आहेत. बालमजुरीचे वाढते प्रमाण संपुष्टात येण्यासाठी सर्वांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण हाच पर्याय असून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. उच्च शिक्षणातूनच जीवन सुखकर आणि समृद्ध बनते. अजूनही समाजात काही ठिकाणी बालमजुरी दिसून येते. देशातील बालमजुरी संपुष्टात येण्याची गरज असल्याचे मत जे. एस. पाटील यांनी केले. अक्कोळ येथील पार्श्वमती कन्या विद्यालयात आयोजित जागतिक बालमजूर विरोधी दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, देश आणि समाजाचा विकास हा शिक्षणावर अवलंबून असतो. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येयडोळ्यासमोर ठेवून परिश्रमाची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते. आजची मुले देशाचे भविष्य असल्याने उच्च ध्येय बाळगून शिक्षण घेत देशाच्या विकासासाठी कार्यरत रहावे. समाजातील समस्यांची निवारण शिक्षणामुळेच होईल. बालमजुरी ही देखील एक समस्याच आहे. त्याचीसोडवणूक करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन अपेक्षित बदलासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी व्ही. डी. इंदलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डी. ए. पाटील, एस. के. पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. पी बी कळंत्रे यांनी सूत्रसंचालन तर एस. डी. खोत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta