प्रा. नानासाहेब जामदार; ‘देवचंद’ मध्ये प्रकट मुलाखत
निपाणी (वार्ता) : प्रमाण लेखनाबाबत असलेली अनास्था चिंतनीय असून त्यासाठी वाचक आणि शिक्षक यांची तीव्र इच्छाशक्ती हवी. प्रमाणभाषेतून केलेले लेखन हे चिरंतन टिकणारे असते.विकासामुळे मुबलक वाचन साहित्य उपलब्ध झाले असून त्याचा वाचताना लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले. देवचंद कॉलेजमध्ये मराठी विभागाने प्रकट मुलाखत आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. संवादक म्हणून प्रा. डॉ. दत्तात्रय पाटील (माजी अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ) यांनी काम केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. डॉ. आशालता खोत होत्या. प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी प्रा. नानासाहेब जामदार यांच्या कार्याबाबत आढावा घेतला.
प्रा. जामदार म्हणाल, सेवानिवृत्तीनंतर अर्थातच वाचनाची आवड जोपासताना प्रमाण लेखनासाठी लेखन आणि त्याबाबतचे काम करण्याची इच्छा आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केल्यास समस्यांचे सहजच निवारण होऊ शकते. वाचन संस्कृतीची चळवळ अतिशय तीव्र व्हायला हवी. त्याचबरोबर पुस्तकाकडे आशय आणि अभिव्यक्ती या दोन अंगांनी पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हायला हवा.
मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश साळुंखे यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. डॉ. पी. डी. शिरगावे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य अशोक पवार तसेच मराठी विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. सदानंद झळके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिवाजी कुंभार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta