
पाच तास आंदोलन : कामगार निरीक्षकांना निवेदन
निपाणी (वार्ता) : शासनातर्फे बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट मंजूर झाले आहे. सुतार कामगारांसाठीही आवश्यक किट मंजूर झाले होते. मात्र निपाणी तालुक्यातील कामगारांना या किटचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कामगार खात्याच्या दुर्लक्षाविरोधात निपाणीत लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी (ता.१९) कामगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कामगार निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
पाचवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कीट, सुतार कामगारांचे कारपेंटर किट तसेच इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यिक किट त्वरित मिळावे तसेच हे किट कामगार कार्यालयातच मिळावे, अशी मागणी करत संघटनेच्या वतीने निपाणीत मोर्चा काढण्यात आला. अक्कोळ रोड सर्कल येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील जुना पीबी रोडवरून मोर्चा माने प्लॉट येथील कामगार कार्यालयापर्यंत गेला. यावेळी कामगार कार्यालयासमोरच धरणे आंदोलन छेडले. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आंदोलन चालू होते.
यावेळी धनाजी कांबळे, अध्यक्ष नेताजी कोळी, संजय कांबळे-हदनाळ, अनिल कापसे-आडी, बबन शिंदे-कुर्ली, प्रकाश शिंदे-कारदगा, अनिल ढेकळे, प्रवीण नायकवडी यांनी मार्गदर्शन करून किट मिळाल्याशिवाय जागेवरून हलणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला. त्यामुळे जिल्हा कामगार निरीक्षक जुगुर यांनी २६ जूनपर्यंत कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक किट व सुतारकीट कामगार कार्यालयातच देणार असल्याचे लेखी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी लाल बावटा तसेच सिटू कामगार संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta