कुर्ली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा : जुन्या आठवणींना दिला उजाळा
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मराठा भवन येथे झाला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक टी. बी. चिखले होते. तब्बल ३५ वर्षांनी भरलेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
सुभाष निकाडे यांनी स्वागत केले. गुरुजनांवर पुष्पवृष्टी करून व्यासपीठावर स्थानापन्न करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास जलार्पण करण्यात आले. टी. बी. चिखले यांनी, सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वजण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी परिश्रम घेत आहोत. परंतु दुसरीकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वच क्षेत्रात वैचारिक प्रदूषण वाढत आहे. त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होत असून त्याला सामोरे जाण्याची गरज असल्याचे सांगितले.
जे. एस. झिंगे, एस. एस. पुजारी, व्ही. ए. पुजारी, जी. टी. वैराट, बी. एस. पाटील, एस. जी. लोंढे, आर. डी. झिनगे, के. आर. वाळवे, प्रभाकर हेंगाडे यानीही मार्गदर्शन केले.
एकाच छताखाली विविध क्षेत्रात काम करणारे शाळेचे माजी विद्यार्थी पाहून शिक्षकही भारावून गेले. सूर्याजी पोटले, आनंदा पाटील, मंगल कवाळे, युवराज कांबळे, टी. एस. पाटील यांनी शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी परिचय करून देतांना सध्याचे कामाचे स्वरूप, कामाचे कार्यक्षेत्र, शाळेविषयी व शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त करतांना सुख, दुःख,आनंद, समाधान, उपकार, कृतज्ञता, आशा कांही भावनांनी वातावरण भारावून गेले.
मान्यवरांच्या हस्ते वर्गातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व लष्करातून सेवानिवृत्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मनोरंजक खेळ घेण्यात आले. सर्वांना सन्मान चिन्हे देवून गौरविण्यात आले. या वर्गात कुर्ली, आप्पाचीवाडी, भाटनांगनूर, सौंदलगा येथील १९८८ ते ९१ या वर्षातील ७० माजी विद्यार्थी उपस्थित होते.
एस. एस. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी साजणे यांनी आभार मानले.