रयत संघटनेची मागणी; तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात यावर्षी एकही वळीवाच पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले असताना पावसा अभावी हे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. शासनाने तात्काळ वाळलेला उसाचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त ऊस उत्पादकांना तात्काळ भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन रयत संघटनेतर्फे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते येथील तहसीलदार कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला व इतर पिके घेतली होती. पण वेदगंगा आणि दूधगंगा नदी कोरडी पडल्याने पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले आहे. पण पाणी नसल्याने तालुक्यातील सुमारे १० हजार एकरातील ऊस वाळला आहे. कुपनलिका आणि विहिरींच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले आहे. पण त्यांचीही पाणी पातळी खालावल्याने ऊस पिक वळत आहे. परिणामी यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाच्या महसूल खात्याने वाळलेले ऊस पिक, नुकसान झालेला भाजीपाला पिकांचा तात्काळ सर्व्हे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी. याशिवाय रासायनिक खतांचे दर कमी होऊनही अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे जुन्या दरानेच अनेक ठिकाणी खतांची विक्री होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी बियाणे आणि खतांचे लिंकिंग केले जात आहे. याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासावे, असे आवाहन राजू पोवार यांनी केले.
अभिजीत बोंगाळे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, मारुती पाटील, शिवाजी वाडेकर, दादासाहेब चौगुले यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेनाच्या प्रती चिक्कोडी प्रांताधिकारी, बेळगाव जिल्हाधिकारी, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहेत.