काकासाहेब पाटील; नागरिकांनी उपस्थित राहावे
निपाणी(वार्ता) : गेल्या काही दिवसापासून निपाणी शहर आणि उपनगरातील पाणी प्रश्न गंभीर बनला याबाबत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सूचना केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील हे शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी चार वाजता येथील नगरपालिका कार्यालय सभागृहात उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले.(ता.२१) बुधवारी (आपल्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, माजी मंत्री व विद्यमान आमदारांनी निपाणी शहराचे पाणी समस्या गांभीर्याने सोडवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. वेळीच नियोजन केले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे नगरपालिकेचे प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी या नात्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेण्याबाबत आपण सुचविले आहे. त्यानुसार शुक्रवारी ते निपाणी येथे येत असून सर्वांशी चर्चा करून काही निर्णय त्यांना तात्काळ घ्यावे लागणार आहेत.
निपाणी पाणी प्रश्नावर तहसीलदार व काही अधिकाऱ्यासमवेत आमदारांनी घेतलेली बैठक म्हणजे केवळ फार्स ठरला आहे. यापूर्वी पाण्याचे नियोजन न केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. यापूर्वीच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन जानेवारी महिन्यातच याबाबत कार्यवाही करणे गरजेचे होते. पण तसे न झाल्याने पाणीटंचाईची परिस्थिती ओढवली आहे. याशिवाय २४ तास पाणी योजना पूर्णपणे फेल गेली आहे. सध्या जवाहर तलावात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीतच आठवड्यातून एकदा पाणी दिले जात आहे. जलशुद्धीकरण घटकातील वाळू आणि आलम याचा ताळमेळ नसल्याने गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी शहराला पुरवठा होत आहे. दहा वर्षात प्रथमच काळमवाडी धरणातील पाण्यानेही तळ घातला आहे. त्यामुळे आता निपाणी शहरात टँकरसह विद्युत मोटारीसह कुटनलिके शिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या बैठकीस नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. यावेळी युवा उद्योजक रोहन साळवे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, माजी सभापती विश्वास पाटील, राजेंद्र चव्हाण, अल्लाबक्ष बागवान, अन्वर हुक्केरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
—-