Saturday , September 21 2024
Breaking News

तलावातील गाळ त्वरीत न काढल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन

Spread the love

श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा इशारा; जवाहर तलाव गेटसमोर ठिय्या आंदोलन
निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस सुरू न झाल्याने नगरपालिका प्रशासनाने तात्काळ तलावातील गाळ काढावा, अन्यथा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेने दिला होता. मात्र पालिकेने सदर निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे शनिवारी(ता२४) जवाहर तलाव गेट समोर संघटनेच्या पदाधिकायांनी तासभर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी आंदोलकांना गाळ काढण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पदाधिकाऱ्यांनी पालिकेला गाळ काढणे जमत नसेल तर आम्ही स्वतः जेसीबी लावून गाळ काढू असा इशारा दिल्यानंतर पालिकेने तलाव परिसरात आज सकाळपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अॅड. निलेश हत्ती म्हणाले, पंधरा ते वीस वर्षांपूर्वी जवाहर तलावातील गाळ काढला होता. त्यानंतर आज पर्यंत तलावातील गाळ न काढल्याने सध्या १३ते १५ फूट इतका गाळ साचला आहे. पालिकेस आम्ही निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पाणीसमस्येचे गार्भिर्य नसल्याचे दिसून येते. पाणीपातळी सोडून ५० फूट बाहेर गाळ काढण्यास काहीच अडचण नसून पत्येक वर्षी सांडव्यावरून वाया जाणारे पाणी बचत करण्याच्या दृष्टीने पालिकेने योग्य उपायोजना करून पाण्याचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासनाने गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करून तलाव गाळ मुक्त करावा. त्यामुळे बंदा तलावात आठ ते दहा फूट जादा पाणीसाठा होऊन निदान या वर्षा पासून तरी शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होणार असे सांगीतले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणा देत तासभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी आंदोलकांशी भेट घेऊन चर्चा केली.
चर्चेनंतर आयुक्त जगदीश हुलगेज्जी म्हणाले, तलाव सुशोभीकरणासाठी सध्या २ कोटी ९० लाख इतका निधी मंजूर झाला आहे. मात्र अजूनही ती रक्कम मिळालेली नाही. सध्या पालिकेच्या माध्यमातून गेल्या चार दिवसापासून झाडे झुडपे हटविण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या शहरास ८ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या तलावातील गाळ उपसा सुरू केल्यास सर्व पाणी गढूळ होऊन शहराला होणारा प्राणीपुरवठाही ठप्प होणार आहे. सदर कामे करत असताना काही प्रशासकीय अडचणी असतात. गाळ उपसा करण्यापूर्वी इंजिनीयरच्या टिममार्फत पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करणे आवश्यक असते. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे शासकीय कामे काही काळ थांबली होती. त्यामुळे लवकरच पालिकेमार्फत आपण पाठपुरावा करणार आहे. यावेळी तलाव परिसरात सीपीआय संगमेश शिवयोगी. उपनिरीक्षक उमादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
यावेळी अॅड. निलेश हत्ती, अजित पारधे, श्रेयस आबले, संतोष तिगडे, अक्षय मलाबाद, दीपक खापे, श्री तिप्पे, सुरज काशीदकर, भरत शिंदे, नरेश मोडीकर, ओंकार बेडगे, मल्लिकार्जुन जोगदे, सुनील दळवी, लखन बेळगेकर, गणेश बेळगले, अमित नाकोळे, संदीप मोहिते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विश्वकर्मा उद्यान लोकसह‌भागातून आदर्श बनवूया

Spread the love  नामदेव चौगुले : लोकसह‌भागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *