प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी; विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
निपाणी (वार्ता) : आपले ध्येय निश्चित करण्याचे आणि सत्यात उतरवण्याचे अगदी योग्य वय तुमचे असून त्यासाठी प्रयत्नशील रहा,असे मत प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी केले.
के.एल.ई संस्थेचे जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयात पी. यू.सी प्रथम वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘अभ्युद’ या स्वागत समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी बोलत होते. अध्यक्षस्थानी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या एच. डी. चिकमठ होत्या.
हुरळी म्हणाले, महाविद्यालयातील सुविधांचा वापर करत असताना आपले वर्तन शिस्तप्रिय असावे. तसेच महाविद्यालयाला आपले कुटुंब समजून स्वतःची आणि महाविद्यालयाची काळजी घ्यावी. जिद्द आणि ध्येय ठेवून अभ्यास केल्यास महाविद्यालयीन शिक्षण काळात नक्कीच यश मिळत असल्याचे सांगितले.
पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या एच. डी. चिकमठ यांनी पीयूसी प्रथम आणि द्वितीय वर्षाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देत असताना सर्व सोयी सुविधांचा योग्य वापर करून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे आवाहन केले. विज्ञान विभाग प्रमुख व्ही. गळतगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रा. पी. यु. टाकळे यांनी स्वागत केले. प्रा. एस. एस. शिंगटे यांनी संस्था आणि महाविद्यालयांची माहिती दिली. प्रा. सौम्या पाटील यांनी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध सोयी सुविधा यांची माहिती दिली. प्रा. आर. एस. शिदलीहाळमठ यांनी महाविद्यालयाचे नियम, शिस्त याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. ए. वाय. मनियार यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. प्रा. बी. एच. नाईक यांनी महाविद्यालयाचे परीक्षा पद्धती आणि परिक्षेकरीता असलेले नियम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. संदीप पवार व प्रा. प्रज्ञा शिरगाकर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. ए. एस. किल्लेदार यांनी आभार मानले.