स्कूलमध्ये भरली विठू नामाची शाळा; आषाढी एकादशी निमित्त आयोजन
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेहमीच सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व पारंपारिक शिक्षणावरही भर दिला जात आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.२९) होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२८) शाळेमध्ये प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त माऊली, माऊली च्या जयघोषात माऊली आश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. निपाणी आणि परिसरात प्रथमच शाळेमध्ये असा कार्यक्रम पार पडल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी रिंगण सोहळा पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना आपले संस्कृती आणि सणाबाबत फारशी माहिती मिळत नाही. विशेष म्हणजे अभंग, किर्तनासह अध्यात्माची ओळख मुलांना व्हावी या उद्देशाने अंकुरम शाळेमध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून पंढरपूर वारीची संस्कृती, ऊन वारा पावसातून चालणारे भाविक, विठू नामाचा अखंड गजर अशा प्रकारचे हुबेहूब चित्र शाळेमध्ये निर्माण केले होते. यावेळी विठुरायाची पालखी, आश्वाचा रिंगण सोहळा सादर करण्यात आला. त्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी पांढरा पोशाख आणि विद्यार्थिनींनी साड्या परिधान केल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात पताका दिसून आल्या. याशिवाय विद्यार्थ्यांनी पांडुरंग, विठ्ठल, रखुमाई आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. याशिवाय झिम्मा फुगडी ही सादर झाल्या. त्यामुळे पांडुरंगा विठ्ठलाच्या जयघोषक शाळेचा परिसर फक्त वातावरणात न्हावून निघाला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या या वेशभूषाचे पालकांनीही तोंडभरून कौतुक केले.
यावेळी प्राचार्या चेतना चौगुले यांनी आषाढी एकादशी आणि पंढरपूरच्या वारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. अमर चौगुले, समन्विका अर्पिता कुलकर्णी, मारुती महाजन, ज्योती चवई, ओसिया शहा, आस्था वाळुंद्रे, स्वाती पठाडे, सावित्री पाटील, हर्षदा पुरंदरे, शिल्पा तारळे, प्रियंका भाटले, नाजनीन होसुरी, पद्मश्री पाटील, माधुरी पाटील, रूपाली यादव, अश्विनी ढाले, अश्विनी हत्ती यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.