गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर; आठवडी बाजारात दलदल
निपाणी(वार्ता) : गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर व परिसरात पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्याने गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शेती कामाला वेळ येणार आहे. गुरुवारी (ता.२९) दिवसभर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे गटारी तुंबून सांडपाणी आणि कचरा रस्त्यावर आल्याने आठवडी बाजारात दल दल निर्माण झाली होती. यावरूनच नगरपालिकेतील गटार सफाईचा दावा फोल गेल्याचे स्पष्ट होत आहे.
गुरुवारी आठवडा बाजार दिवशी सकाळी आणि दुपारच्या सत्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्यामुळे व्यापाऱ्यासह ग्राहकांची तारांबळ उडाली. येथील कोठीवाले कॉर्नर, अशोकनगर परिसरात गटारी केर कचऱ्याने तुंबल्याने सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत होते. गटारीतील कचरा आणि मातीमुळे बाजारात अनेक ठिकाणी दलदलपाहायला मिळाली. अशा घाणीच्या साम्राज्यातच अनेक व्यापारी व शेतकरी भाजीपाला विक्री करीत होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निपाणी नगरपालिकेतर्फे शहर आणि उपनगरातील गटारी व नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. पण अजूनही बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबले असून सांडपाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी तुंबून रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नगरपालिकेचा गटार व नालेसफाईच्या कामाचे पितळ किरकोळ पावसातच उघड झाले आहे. त्यामुळे मोठा पाऊस सुरू होण्यापूर्वीच लहान मोठ्या गटारींची तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
————————————————————–
कचरा, गाळ पुन्हा गटारीत
नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील गटारींची स्वच्छता करून त्यातील गाळ व कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकला होता. पण गुरुवारी झालेल्या किरकोळ पावसामुळे कचरा आणि गाळ पुन्हा गटारीतच पडल्याने पुन्हा गटारी तुंबल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta