बंदोबस्त कडक : ना ईकडचे ना तिकडचे
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या दुधगंगा नदी जवळ कर्नाटक सीमा तपासणी नाका व कागल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरटीओ ऑफिस येथे महाराष्ट्राचा सीमा तपासणी नाका सुरू आहे.
या दोन्ही सीमा तपासणी नाक्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणे व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या प्रवाशांना त्रास होऊ लागला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा तपासणी नाके हे परस्पर विरोधी दिशेला असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या प्रवाशांना परत पाठवले असता महाराष्ट्रातील सीमा तपासणी नाक्यावर अडवण्यात येते. तर महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावरुन परत पाठवले असता कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर अडवण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी प्रवाशांना ना घर का ना घाट का अशी अवस्था निर्माण होत आहे.
महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावरुन गेल्या दोन-तीन दिवसात शेकडो चार चाकी वाहनांना परत पाठवून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या शेकडो वाहनांना कर्नाटक सीमा नाक्यावरून परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही सीमा तपासणी नाक्यावर अडवणूक होत असल्याने प्रवासी वर्गाला जायचे तर कोठे असा प्रश्न पडला आहे.
कर्नाटकातील सीमाभागातील गावांचा थेट महाराष्ट्राशी संपर्क येत असल्याने कर्नाटकातील सीमा भागातून महाराष्ट्रात जाणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर कर्नाटक लगत असणार्या महाराष्ट्रातील गावातील लोकांना महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावर अडवणूक होते. त्याचप्रमाणे येताना त्यांची अडवणूक कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर होत आहे. यामुळे सीमा भागातील नागरिकांना या दोन्ही तपासणी नाक्यांचा मोठा त्रास होऊ लागला आहे.
————
सांगलीहून बेळगावला जात होतो. कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर अडवण्यात आले. त्यानंतर परत जात असताना महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावर अडवण्यात आले. रिपोर्ट नसल्याने व कोरोना डोस एकच झाले असल्याकारणाने महाराष्ट्रात सोडण्यात येत नसल्याचे सांगितले.
– भुषण पाटील, सांगली.
Check Also
यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ६ हजार मिळालेच पाहिजेत
Spread the love राजू पोवार ; विधानसभेवरील मोर्चाबाबत निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …