
निपाणी (वार्ता) : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याला डीपी मधील विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती ज्योत्याप्पा गोलभावी (वय ३२ रा. सोलापूर-संकेश्वर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मारुती आणि त्याचा भाऊ हे शेती करत होते. मात्र कोरोना काळापासून त्यांनी टाटा एस गाडी घेऊन भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानुसार त्यांनी गेल्या तीन वर्षापासून निपाणी, चिकोडी आणि संकेश्वर भागात आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला विक्री करत होते. गुरुवारी (ता.६) आठवडी बाजार असल्याने ते सकाळी निपाणी बाजारात आले होते. येथील बेळगाव नाक्यावर असलेल्या लोकमान्य टिळक उद्यानाचा मागील बाजूस असलेल्या डीपीच्या शेजारीच त्यांनी आपली टाटा एस गाडी लावून बाजार मांडला होता. पण दुपारच्या सत्रात पावसाच्या सरी आल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचे ताडपत्री बांधण्यासाठी डीपी असलेल्या खांबावर मारुती गोलभावी चढले होते. यावेळी ताडपत्रीची दोरी खांबाला बांधत असतानाच त्यांना विद्युत भारित तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे ते जोरात खाली आढळले. तात्काळ त्यांना येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारास साथ न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
गुरुवारच्या आठवडी बाजारामध्ये दरवेळी ते याच ठिकाणी आपले वाहन थांबवून बाजार करत होते. पण या आठवड्यात किरकोळ पाऊस सुरू झाल्याने ताडपत्री बांधण्यासाठी गेले असताना त्यांचा हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच निपाणी येथील हेस्कॉमचे प्रभारी अभियंते अक्षय चौगुला व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल घेऊन त्यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गोलभावी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यांनी हा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोलभावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मारुती हे अविवाहित असून त्यांच्या मागे भाऊ, आई, वडील, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta