निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्यात आदर्श ठरलेली बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी म्हणून सुमित रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक संतोष हेगडे उपस्थित होते.
संघाचे मुख्य कार्यनिर्वाहक आर. टी. चौगुला यांनी स्वागत केले. सन २०२३ ते सन २०२८ अखेर नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालकांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी संतोष हेगडे यांनी जाहीर केले. संघातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
नूतन अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक वर्षापासून कार्यरत आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून तळागाळातील लोकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध केले आहेत. २९९३ सभासद असलेल्या या संघा तर्फे शेतकरी सभासदांना अल्प दरात ट्रॅक्टर, कृषी अवजारे, रासायनिक खते, विमा संरक्षण, कृषी मार्गदर्शन शिबिरे आयोजन जात आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून ठिबक सिंचनाचे साहित्यही उपलब्ध केले आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक २० कोटी पेक्षा अधिक पत मंजूर मिळवणारी हा एकमेव संस्था आहे. निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे संस्था प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. संचालक मंडळ व सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी यापुढे आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नूतन उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक बाळासाहेब सातपुते, राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, प्रवीण पाटील, राजेंद्र एदमाळे, तैमूर मुजावर, सुनीता बंकापुरे, प्राजक्ता पाटील, राजू गजरे, सहाय्यक कार्यनिर्वाहक अधिकारी काकासाहेब बेळंकी, राकेश फिरगन्नावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मलिकजान नदाफ यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta