निपाणी म. ए. युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन; पोर्टलमध्ये सीमाभागाचा समावेश व्हावा
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी ‘गट क’ विभागातील एकूण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून २६ जूनपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना सीमावासियांना तांत्रिक अडचणी जाणवत असून या अडचणी दूर करून वेळ वाढवून देण्याच्या मागणीचे निवेदन म. ए. युवा समितीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र- महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांतील मराठी भाषिकांना महाराष्ट्र राज्याचे सक्षम नागरिक म्हणून मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक क्र. मकसी १००७/प्र. क्र.३६/का. ३६ दि. १० जुलै २००८ नुसार ज्या पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्याची अट विहित करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करताना त्यांचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य आहे किंवा नाही, या अटींची छाननी करताना ८६५ गावांतील १५ वर्षांचे वास्तव्य विचारात घेण्यात यावे, असा उल्लेख आहे.
त्यानुसार आता तलाठी ‘गट क’ प्रवर्गाच्या जाहिरातीमध्ये आणि अर्ज दाखल करण्याच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये सीमाभागातील ८६५ मराठी भाषिक गावांचा समावेश नाही. त्यामुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे सीमाभागातील मराठी भाषिक उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहात आहेत. २०१९ च्या तलाठी पद भरतीमध्ये सीमाभागातील ८६५ गावांचा उल्लेख होता. अर्ज करण्यास कोणतीही अडचण आली नव्हती.
आता उद्भवलेली तांत्रिक अडचण महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. मकसी १००७/प्र. क्र.३६/का.३६ ता. १० जुलै २००८ चा आधार घेऊन दूर करण्यात यावी. तलाठी पदासाठी अर्ज करण्याची तारीख १७ जुलैपर्यंत आहे. ही तारीख वाढवून सीमाभागातील ८६५ मराठी भाषिक गावांचा ऑनलाईन पोर्टलमध्ये समावेश करावा, अशी मागणी युवा समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta