जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी: स्तवनिधीमध्ये गुणीजनांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळामध्ये समाजात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. जैन समाज हा आर्थिक दृष्ट्या सदृढ असला तरीही पालकांमध्ये अजूनही द्विधा मनस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करत त्यामध्ये ध्येय ठेवून कठीण परिश्रम घेतल्यास जीवनात निश्चितच यश मिळते, असे मत नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी यांनी व्यक्त केले. दक्षिण भारत जनसभेच्या वीर सेवा मध्यवर्ती दला तर्फे आयोजित गुणी विद्यार्थी व मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील होते.
प्रारंभी वीर सेवा दलाचे उपाध्यक्ष सुभाष मगदूम यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन झाले. त्यानंतर आचार्य कामकुमार नंदी महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
उत्तम पाटील म्हणाले, गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा समाजासाठी निश्चितच चांगला उपयोग होईल. वीर सेवा दलातर्फे धार्मिकतेबरोबरच संस्कार, आरोग्य आणि शिक्षणालाही महत्त्व दिले आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून रावसाहेब पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची शिष्यवृत्ती जमा केली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होत आहे. अजूनही जैन समाजावर अन्याय होत असून अल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. महिलामुळेच जैन समाज टिकला असून त्यांच्याकडूनच जोपासना होत आहे. या पुढील काळात समाजाचे संघटित होण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भविष्यात मुनी महाराज आणि साधू संतांच्या वरील हल्ले थांबविण्यासाठी समाजांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वीर सेवा दलाचे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अक्षयकुमार पाटील यांनीही समाज बांधवांना मार्गदर्शन केले. मध्यवर्ती वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजित पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमात अजित बंडी, तात्यासाहेब पाटील, रावसाहेब कुन्नुरे, महेंद्र पाटील, बाळासाहेब पल्लके, आनंद उगारे, सचिन मेक्कळकी, अभिषेक कोल्हापुरे, अक्षय पाटील, अमोल पाटील महिला महामंत्री अनिता पाटीलयांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तात्यासाहेब पाटील, आर. बी. खोत, बाळासाहेब मगदूम, आनंद उगारे, माणिक रोट्टी, महेंद्र पाटील, अभय भागाजे, कुंथन वडेर, पवन मगदूम, प्रवीण पाटील, निरंजन पाटील -सरकार यांच्यासह निपाणी चिकोडी परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta