
निपाणी भूमी विभागातील घटना; अभिषेक बोंगाळे, पारेश सत्ती यांना अटक
निपाणी (वार्ता) : नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना येथील उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे आणि भूमी विभागातील संगणक चालक पारेस हत्ती हे दोघेजण रंगेहात लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले. बुधवारी (ता.१९) दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे तहसीलदार कार्यालयिमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत जिल्हा लोकायुक्त अजीज कलादगी यांनी ही कारवाई करून दोघांनाही बेळगाव येथील जिल्हा विशेष न्यायालयासमोर उभे केले आहे.
याबाबत घटनास्थळासह अधिकाऱ्यांनी दिलेली अधिक माहिती अशी, गळतगा येथील वकील राजकुमार शिंदे यांच्याकडे तेथीलच महिला रत्नव्वा गि-याप्पा कुगे यांनी कागदपत्रांमधील नावाच्या दुरुस्तीची माहिती दिली होती. त्यानुसार वकील शिंदे यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता करून निपाणी तहसीलदार कार्यालयातील उप तहसीलदार अभिषेक बोंगाळे यांच्याकडे दिली होती. एक महिना उलटूनही काम होत असल्याने वारंवार शिंदे यांनी बोंगाळे यांच्याशी संपर्क साधला. अखेर बोंगाळे यांनी या कामासाठी पाच हजार रुपये द्यावे लागणार असल्याचे सांगितले. त्यानुसार शिंदे यांनी संबंधित महिलेची संपर्क साधून ही माहिती दिली.
दरम्यान कामासाठी संबंधित महिलेला पाच हजार रुपये देणे कठीण झाले होते. त्यामुळे शिंदे यांनी रक्कम देण्याचे तयारी दर्शवून याबाबत मंगळवारी (ता.१८) लोकायुक्तांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार वकील शिंदे यांनी बुधवारी (ता.१९) दुपारी पाच हजाराचे रक्कम देण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालय परिसरात आले होते. तत्पूर्वीच जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया, लोकायुक्त उपनिरीक्षक अजिज कलादगी, सहाय्यिका अन्नपूर्णा आणि सहकाऱ्यांनी सापळा रचला होता. वकील राजकुमार शिंदे यांच्याकडून भूमी विभागातील संगणक चालक पारेस सत्ती हे पाच हजाराचे रक्कम स्वीकारत होते. सोबत उप तहसीलदार अभिषेक बोंगाळे उपस्थित होते. त्यामुळे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेऊन घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतली. त्यानंतर त्यांना बेळगाव येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले.
————————————————-
सर्वच शासकीय कार्यालयात तक्रारी
शेती, प्लॉट, सरकारी योजनासह इतर मालमत्ता संदर्भात निपाणी येथील सर्व शासकीय कार्यालयात अधिकाऱ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्वप्रथम येथील तहसीलदार कार्यालयातच लोकायुक्तांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे येथील सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta