विविध आकारासह रंगसंगती : महिलांचा कल मॅचिंगकडे
निपाणी : राज्य सरकार तसेच प्रशासनाकडून मास्क वापराची सक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांकडून मास्कची मागणी वाढली आहे. निपाणी बाजारपेठेत ठिकठिकाणी रंगबिरंगी विविध प्रकारच्या मास्कचे दुकाने सजली आहेत. महिलांकडून विशेषत: मॅचिंग मास्क खरेदीकडे कल वाढला आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून दक्षता घेण्यात आली आहे. राज्य सरकारकडून रविवार (ता. 28) नवीन नियमावली घोषित केली. त्यानुसार सामान्य नागरिकांसह व्यावसायिक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणारे चालक सर्वाना मास्कची सक्ती केली आहे. वापर न करणार्या नागरिकांना 100 रुपये तर व्यावसायिकांना 500 रुपयांपर्यंत दंड होणार आहे. वीस रुपयाच्या मास्कसाठी पाचशे रुपये दंड भरण्यापेक्षा मास्क खरेदी करणे सोयीचे राहणार आहे. या विचाराने बाजारपेठेत मास्कची मागणी वाढली आहे. वीस रुपयांपासून तर शंभर रुपयेपर्यंत मास्क खरेदी विक्री होत आहे. रंगबिरंगीविविध आकार, डिझाईनचे मास्क बाजारात विक्रीस आले आहे. निपाणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने काही महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून निर्बंधांमध्ये शिथिलता दिली होती. त्यामुळे नागरिकांकडून शहरातून कोरोना हद्दपार झाला आहे, अशी समजूत करून घेतली होती. सुमारे 90 टक्के नागरिकांनी मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष केले होते. रविवारी सरकारकडून मास्क वापर सक्तीची घोषणा करताच नागरिकांनी पुन्हा मास्क वापराकडे लक्ष केंद्रित केले आहे. घोषणेनंतर पहिल्या दिवशी सुमारे पंचवीस ते तीस टक्के नागरिक मास्कचा वापर करताना दिसून आले. मास्क खरेदीकडेदेखील त्यांचा कल दिसून आला.
—
मॅचिंगकडे कल
दैनंदिन गोष्टी प्रमाणेच सध्या मास्कदेखील नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे नागरिकांकडून विविध प्रकारचे मास्क खरेदीकडे कल वाढला आहे. विशेषत: महिला वर्गामध्ये प्रत्येक गोष्टीत मॅचिंगला महत्त्व दिले जाते. तर मास्क अपवाद कसे ठरणार. त्यांच्या ड्रेस, साडीस मॅचिंग रंग, डिझाईनचे मास्क खरेदीकडे महिलांची पसंती अधिक आहे. त्यांच्या गरजेनुसार त्यांनीदेखील रंगबिरंगी डिझाई मास्क विक्रीस आणले आहेत.
—
’गेल्या काही दिवसापासून मास्कची मागणी घटली होती. परंतु सरकारने मास्क वापर सक्तीचा करतात दोनच दिवसात 30 ते 40 टक्क्यांनी मागणी वाढली आहे.’
– चंद्रकांत सुरंगे, मास्क विक्रेता, निपाणी.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …