म्युन्सिपल हायस्कूल बचाव कृती समिती : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (संजय सुर्यवंशी) : सत्तेच्या जोरावर निपाणी नगरपालिकेने सुस्थितीत असलेली म्युन्सिपल हायस्कूलची इमारत सरकारला हस्तांतर करून पाडण्याचा घाट घातला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले दोन्ही ठराव बुधवार (ता. 25) ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास गुरुवार (ता. 26) पासून निपाणी नगरपालिका समोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा म्युन्सिपल हायस्कूल बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी (ता.9) देण्यात आला.
कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, माजी आमदार काकासाहेब पाटील, युवानेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार डॉ. मोहन भस्मे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
नगरसेवक विलास गाडीवड्डर म्हणाले, 13 जुलै रोजी नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये विषय क्रमांक 11 मध्ये नगरपालिकेच्या मालकीची असणारी म्युनिसिपल हायस्कूलची इमारत सरकारला हस्तांतर करायचे तर विषय क्रमांक 12 मध्ये हस्तांतर करून ही इमारत पाडण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. केवळ सत्तेच्या जोरावर सत्ताधारी गटाने हे षड्यंत्र रचले आहे. दोन्ही विषयांमध्ये हस्तांतरण व पाडायचे असे म्हटले आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाने मंजूर केलेल्या ठरावामध्ये विसंगती दिसून येत आहे. सुमारे दहा ते बारा एकर जमिनीवर सत्ताधारी गटाने डोळा ठेवून हा कुटील डाव रचला आहे. विद्यमान नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी तीन नंबर शाळेची इमारत पाडून आपले राहते घर बांधले आहे. शिवाय सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी बाजार समितीच्या मालकीची दहा गुंठे जमीन केवळ लाख रुपयाला देऊन सत्तेचा दुरुपयोग चालवला आहे. म्युनिसिपल हायस्कुल इमारत ही तालुक्याची नागरिकांच्या भावनेचा प्रश्न आहे.
सध्या या ठिकाणी मराठी, इंग्रजी, कन्नड भाषेचे शिक्षण दिले जाते. असे असताना सत्ताधारी गटात चुकीचे कार्य सुरू आहे.
कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले, निपाणी नगरपालिकेने इमारत हस्तांतर व पाडणे हे दोन्ही ठराव 25 पर्यंत मागे न घेतल्यास नगरपालिकेचे समोर 26 पासून उग्र आंदोलन छेडले जाईल हे आंदोलन जोपर्यंत ठराव मागे घेतले जात नाहीत. तोपर्यंत सुरूच राहील. शिक्षणाची गंगा असणारी इमारत संपूर्ण तालुक्याची शान आहे. आपल्या निपाणी तालुक्याची पूर्वीपासूनची असलेली ज्ञानगंगा टिकली पाहिजे. यासाठी सर्वांनी मागे न हटता हा लढा तीव्र करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.
यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, दि. 14 जुलै रोजी प्राथमिक स्वरुपात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मुन्सिपल हायस्कूलच्या इमारतीच्या बचावासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून कृतिसमितीने तहसील प्रशासनाला निवेदन दिले आहे. यामध्ये नगरपालिकेने दोन्ही ठराव माघार घ्यावेत व निपाणीची असलेली शान वाचली जावी ही आमची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तेच्या जोरावर हिटलरशाही सुरू ठेवली जाऊ देणार नाही असे सांगून दि. 25 पर्यंत योग्य तो निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, यासाठी टोकाची भूमिका घेतली जाईल असा इशारा दिला.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, जनरल सभेमध्ये सत्ताधारी गटाने हे दोन्ही विषय आणून संपूर्ण निपाणी शहर व तालुक्याची दिशाभूल केली आहे. सर्वसाधारण सभेत जनतेच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सत्ताधारी गटाने सरकारी जागा इमारती आपल्या कब्जात घेण्याचा कुटिल डाव रचला आहे. त्यामुळे आपण हातात घेतलेल्या प्रश्नाची तड लागेपर्यंत कृती समितीच्या माध्यमातून हा लढा सुरूच राहील असे सांगितले.
माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी निवेदनाचे वाचन केले. निवेदन स्वीकारून तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी जिल्हा व वरिष्ठ पातळीवर पाठवून देऊन योग्य क्रम घेतला जाईल असे सांगितले.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरी, संजय पावले, दत्ता नाईक, शेरू बडेघर, संजय सांगावकर, दिलीप पठाडे, दीपक सावंत, अनिस मुल्ला विनायक उमराणे, युवराज पोळ, जयवंत कांबळे, रियाज मकानदार, सचिन खोत, किरण कोकरे, वैभव पाटील, संभाजी गायकवाड, सुदेश बागडी, अमर शिंत्रे, निरंजन पाटील, गजानन कावडकर, अस्लम शिकलगार, शिरीष कमते, अनिल भोसले, नितीन साळुंखे, अरुण जाधव, अमित शिंदे, राजू पाटील-अक्कोळ, चेतन स्वामी, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते, टॉपस्टार युथ क्लब व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत
Spread the love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …