मंदिरात सॅनिटायझर फवारणी : कोरोना मुक्तीसाठी साकडे
निपाणी : गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच सण उत्सवावर निराशेचे सावट पसरले आहेत. अशा परिस्थितीत निपाणी शहर आणि ग्रामीण भागात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी (ता. 9) सोशल डिस्टन्स ठेवत शिवमंदिरात हर, हर महादेवाचा गजर झाला. मात्र कोरोनामुळे इतर धार्मिक कार्यक्रम, तीर्थप्रसाद, शाबू खिचडी वाटपाला फाटा देण्यात आला. यावेळी महादेव गल्लीतील पुरातन महादेव मंदिरात निरंतरपणे सॅनिटायझरची फवारणी करण्यासह भाविकांना मास्क अनिवार्य करण्यात आले होते. सोमवारी पहाटे श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार दाम्पत्यांच्या हस्ते मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत शिवलिंगास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर उत्सव मूर्तीची फुलाने आरास करण्यात आली. पहाटे सहा वाजल्यापासूनच सोशल डिस्टन्स बाळगत भाविकांनी निदर्शनास सुरुवात केली. तर सर्वांना सुरक्षितपणे दर्शन मिळावे यासाठी महादेव मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे विशेष सोय करण्यात आली होती. कोरोना हद्दपार होण्यासाठी भाविकांसह कमिटीतर्फे महादेवाला साकडे घालण्यात आले. दिवसभर महादेव मंदिर परिसरात नागरिकांची वर्दळ असली तरी मंदिरासह परिसरात सोशल डिस्टन्स पाळला जात होता. यावेळी मंदिर परिसरात बेल, नारळ, साखर, कापूर, ऊद व इतर दुकाने थाटली होती. तर दिवसभर मंदिर परिसरात गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते थांबून नागरिकांना सोशल डिस्टन्स आणि मास्कचे महत्व पटवून देत होते. याशिवाय महादेव मंदिर कमिटीतर्फे मंदिराच्या दर्शनी भागात कोरोना जनजागृतीबद्दलचे फलक लावले होते. तर मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने सायंकाळी मंदिर परिसर उजळून निघाला होता. एकंदरीत कोरोनाच्या काळातही येथील महादेव मंदिरात भाविकांनी थेट महादेवाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.
—–
1 किलो चांदीचा हार
महादेव मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे यापूर्वी भाविकांच्या सहकार्याने चांदीची गणेशमूर्ती तयार केली आहे. प्रत्येक संकष्टीला ही मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवण्यात येत आहे. यंदा श्रावणानिमित्त विद्या संवर्धक मंडळाचे संचालक संजय मोळवाडे यांनी 1 किलो चांदीचा हार प्रदान केला असल्याचे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले.
Check Also
मूलभूत सोयी सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचे आमदार जोल्ले यांना निवेदन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, कमलनगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, गटारी …