आधार लिंक, केवायसीच्या समस्या ; शहर ग्रामीण भागात गर्दी
निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेअंतर्गत पाच किलोवरील धान्याची रक्कम थेट संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रेशनकार्डधारकांच्या खात्यावर सदर पैसे जमा होत आहेत. निपाणी तालुक्यात एकूण 67 हजार 386 बीपीएल तर 1580 अंत्योदय रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ होणार आहे. मात्र त्यापैकी अद्याप 11 हजार 545 रेशनकार्डे कोणत्या ना कोणत्या त्रुटीमुळे या ‘धनभाग्य’च्या सुविधेपासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 35 हजारावर लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा लोकांनी अर्धवट राहिलेली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने गॅरंटी योजना जाहीर करताना सत्तेत आल्यानंतर प्रतिव्यक्ती दहा किलो तांदूळ मोफत देणार असल्याचे जाहीर केले. सत्तेवर आल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली. मात्र तांदळाचा पुरवठा करण्यात केंद्राने असमर्थता दर्शविल्याने राज्य सरकारने पाच किलोवरील धान्याच्या बदल्यात 34 रुपये प्रति किलो याप्रमाणे प्रतिव्यक्तीचे 170 रुपये संबंधित रेशन कार्डधारकाच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या महिन्याच्या धान्यासोबत रक्कमही खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. निपाणी तालुक्यात 67 हजार 386 रेशन कार्डच्या माध्यमातून एकूण 2 लाख 12 हजार 943 जणांना महिन्यासाठी 170 रुपये याप्रमाणे 3 कोटी 62 लाख 310 रुपये इतका लाभ होणार आहे.
अंत्योदय रेशनकार्डधारकांना महिन्यासाठी 35 किलो धान्य दिले जाते. त्यामुळे या कार्डवर 3 किंवा त्यापेक्षा कमी लोक असतील तर त्यांना मिळणार नाही. तर 3 पेक्षा अधिक जेवढे लोक असतील तेवढ्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तालुक्यात 67 हजारपैकी अजूनही 11 हजारावर रेशन कार्डच्या विविध समस्या आहेत. यामध्ये संबंधित व्यक्तीचे बँक खाते नसणे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणे, सलग तीन महिने रेशनचा लाभ घेतलेला नसणे, बायोमेट्रिक ठशामध्ये अडचण येणे आदी अडचणी असल्याने अशा लोकांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत.
ज्यांचे पैसे जमा होण्यास अडचणी आहेत, अशांची यादी संबंधित रेशन वितरण केंद्र समोर लावण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे यादीत नाव असेल तर अशा व्यक्तींनी बँकेत जाऊन खाते काढणे, आधार लिंक करणे किंवा जी काही त्रुटी असेल ती दूर करून घ्यावी त्यानंतर खात्यावर पैसे जमा होतील. यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित रेशन वितरण केंद्रामध्ये किंवा अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta