Saturday , September 21 2024
Breaking News

निपाणी शहरातील गुळगुळीत रस्त्यावर पडले खड्डे!

Spread the love

 

पहिल्या पावसातच दर्जा उघड ; वाहनधारक, नागरिकांत संताप

निपाणी (वार्ता) : शहरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या चकचकीत रस्त्यावरून जाताना पुढे कोणत्याही ठिकाणी खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निपाणी शहरातील आहे. त्यामुळे वाहनधारक, त्यांची वाहने, पायी चालणारे नागरिक चिखलाने माखून घरी येणार नाहीत, याची काही शाश्वती नाही. अनेक मुख्य रस्त्यांवर तुकड्यातुकड्यांत खड्डे, चिखल पाहायला मिळत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे थोडाफार पाऊस झाला तरी खड्डे, चिखलाचा सामना करणे निपाणीकरांना भाग आहे.
शहरात तीन महिन्यापूर्वी अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते. पण आठवड्याभरात पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा सामना वाहनधारक आणि नागरिकांना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामे झाली हे खरेअसले तरी ठिकठिकाणी कामे अपूर्ण असल्याने चांगल्या रस्त्यावरून गेल्यानंतर पुढे खड्डे, चिखलमय रस्त्यातूनच वाहनधारकासह नागरिकांना जाणे भाग पडत आहे.त्यामुळे आपण तालुक्याच्या ठिकाणी आलो की ग्रामीण भागात, असा प्रश्न पडतो. खड्यांमुळे थोडा जरी पाऊस झाला, तरी या खड्ड्यांचे रूपांतर डबक्यांमध्ये होत आहे.
शहर आणि उपनगरामध्ये ठिकठिकाणी रस्ते खोदल्याने मातीमुळे चिखल होतो. त्यामुळे डबके आणि चिखलातूनच वाहनधारक, पादचाऱ्यांना कसरत करत ये-जा करावी लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यातूनच वाहनधारक आणि नागरिकांना ये जा करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.


रस्ते खोदणाऱ्यांना अभय
भूमिगत गटार योजना, पाणीयोजनेची कामे, केबल टाकणाऱ्या विविध कंपन्या, खासगी नळजोडणी अशा विविध कामांसाठी रस्ते खोदले गेले, आजही खोदले जातात. रस्ते खोदताना नगरपालिकेची परवानगी आवश्यक असते. रस्ता पूर्ववत करून देण्याची जबाबदारी संबंधितांची किंवा मोबदल्यापोटी मिळालेल्या रकमेतून नगरपालिका किंवा संबंधित यंत्रणांनी ते रस्ते दुरुस्त करणे गरजेचे असते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते, किंवा थातूरमातूर काम केले जाते. अनेक कंपन्या नगरपालिकेकडे पैसे जमा करतात, त्यातून रस्ते दुरुस्त होतात का, हा संशोधनाचा भाग आहे. काही ठिकाणी नवीन रस्तेही खोदले गेले आहेत हे विशेष!
——————————————————————–
‘सध्या पावसाळा सुरू असून शहरातील काही रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लवकरच हे खड्डे नगरपालिकेच्या माध्यमातून बुजवले जातील.’
-जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी

 

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *