
टंचाईसह ऊसावर कीड ; दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल
निपाणी (वार्ता) : तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरीमावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे, पावसाअभावी ऊसाचे पीक वाळून गेले असताना आता लोकरी माव्याचे संकट आल्याचे ऊस उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.
गेल्या आठवड्यात तालुक्यात ढगाळ व कोंदट वातावरण निर्माण झाले. महिन्यापूर्वी पावसाळा सुरू होऊन अलीकडच्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तालुक्याच्या ऊसाचे मोठे क्षेत्र असून आता येथे ऊसावर लोकरी माव्याची कीड आली असून या किडीचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.
लोकरी माव्याने उसाची पाने पांढरी, तसेच काळे पडले आहेत. ही कीड ऊसातील हरितरस शोषून घेत असल्याने वाढ खुंटत आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, सिंचन योजनांमुळे झालेली पाण्याची अपेक्षित उपलब्धता यामुळे तालुक्यात २२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. या ऊसाला लोकरी माव्याने विळखा घातला असल्याने उत्पादन कमी होऊन आर्थिक हानीची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
आगामी गळीत हंगामात गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाची पावसाअभावी चांगली वाढ झालेली नाही. आडसाली ऊस उंच असल्याने औषध फवारणी करणेही अवघड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकरी मावा व रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी अधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या संकटाचा परिणाम साखर उद्योगावरही होणार असल्याने साखर कारखान्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणीची प्रात्यक्षिके देऊन प्रसंगी औषध पुरवठाही होणे गरजेचे आहे. यापूर्वी आलेल्या संकटकाळात लोकरी मावा खाणारी मित्रकीड विकसित झाली आहे. ही मित्रकीड या परिसरात वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शेतकऱ्यांना ऊस शेतीत सुगीचे दिवस आले असताना आता मात्र लोकरी मावा प्रादुर्भावाचे संकट आ वासून असल्याने ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरत असल्याचे दिसून येत आहे. हुकमी व चांगला आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या ऊसाच्या पिकावरील लोकरी मावा रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
—————————————————————-
‘तालुक्यात ऊसावर काही ठिकाणी लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन सुरू केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून लोकरी मावा आटोक्यात आणावा.’
– दीपक कौजलगी, प्रभारी, तालुका कृषी अधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta