निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यात 15 जुलैनंतर पावसाचा जोर वाढला. परिणामी तालुक्यातील बहुतांशी बंधारे पाण्याखाली गेले होते. सध्या सर्व बंधाऱ्यांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. पाऊसही थांबल्याने तालुका प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त घरांची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार ए आणि बी प्रकारात घराचे नुकसान झाले असल्यास त्यांना पाच लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नुकसानग्रस्त घरांना भरपाई दिले जाणार आहे. अभियंता, पिडीओ आणि तलाठी यांच्या पथकामार्फत नुकसानीची आकडेवारी निश्चित केली जात आहे. त्यानुसार 25 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असल्यास संबंधित घरमालकाला 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. 26 ते 75 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्यास ते घर बी प्रकारात आणि 75 ते 100 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्यास ए वर्गात समाविष्ट केले जाणार आहे. ए आणि बी वर्गातील नुकसानग्रस्त घरमालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. निपाणी तालुक्यात आतापर्यंत पावसाने 26 घरांचे नुकसान झाले आहे. यात ए आणि बी वर्गात 7 तर सी वर्गात 19 घरांचा समावेश आहे.
सोमवारी तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी कोगनोळी, कुर्ली आणि नांगनूर येथे भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यानंतर संबंधित घरमालकांकडून आवश्यक कागदपत्रे मागवण्यात आले आहेत. या घरांसाठी तात्काळ भरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात येत आहे. यामध्ये ए व बी प्रकारातील घरांची भरपाईची पाच लाख रुपयांची रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित घरमालकाच्या खात्यावर जमा होणार आहे. तर सी प्रकारातील 50 हजाराची रक्कम ही तहसीलदार कार्यालयामार्फत दिली जाणार आहे.
——————————————————————-
एकदाच भरपाई मिळणार
नुकसानग्रस्त घरमालकाची कागदपत्रे योग्य प्रकारे तपासूनच भरपाई दिली जाणार आहे. गेल्या तीन वर्षात भरपाई घेतली असेल तर अशा व्यक्तींना पुन्हा भरपाई मिळणार नाही. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असल्याने यापूर्वी भरपाई घेतलेले लाभार्थी तात्काळ शोधणे सोपे झाले आहे. सध्या 26 घरांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यानंतर पुन्हा पाऊस झाल्यास त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा स्वतंत्र सर्व्हे केला जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta