निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब ऑफ निपाणी, रोटरी क्लब ऑफ हुबळी आणि शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी (ता.१९) मोफत गुडघे रोपण व मणक्याची शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आंदोलन नगरातील रोटरी क्लबच्या डॉ. एम. जे. कशाळीकर सभागृहात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सदर शिबिर पार पडणार आहे.
रोटरी क्लबने आजवर सामाजिक बांधिलकीतून निपाणी परिसराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विकासात मोलाची भर घातली आहे. प्रत्येक महिन्याला विविध प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी केली जाते. आता १९ रोजी परिसरातील गुडघेदुखी व मणक्याच्या दुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध सांधे व गुडघे रोपण तज्ञ डॉ. विरल गोंदालिया, डॉ. अमृत सिंह, वरिष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. राज लिंबानी आणि डॉ. संदीप पाटील हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. यावेळी रोग निदान झाल्यानंतर आवश्यक उपचार रुग्णांवर केले जाणार आहेत. शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास अशा रुग्णांची शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद येथे ५० टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
तपासणीसाठी शिबिरास येणाऱ्या रुग्णांनी येताना एक्स-रे आणि मेडिकल रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्या-खाण्यासोबत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येणार असून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरीचे अध्यक्ष प्रवीण तारळे, संजय नंदर्गी, राजेश तीळवे आणि महांतेश हिरेकुडी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta