डॉ. अच्युत माने ; निपाणीत शोकसभा
निपाणी (वार्ता) : संवेदनशीलता हरवत चाललेल्या या काळात माणूसपण टिकावे, यासाठी झटणाऱ्यांचे निघून जाणे क्लेशदायी आहे, अशा शब्दांत डॉ. अच्युत माने यांनी विचारवंत हरी नरके, पत्रकार मनोहर बन्ने, रानकवी शामराव जाधव यांना आदरांजली वाहिली.
अंकुर कवी मंडळ, काव्यकुसुम समूह व ज्येष्ठ नागरिक संघ, निपाणी यांच्यावतीने प्रोबस क्लबच्या सभागृहात आयोजित शोकसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. एन. डी. जत्राटकर, डॉ. रघुनाथ कडाकणे होते.
डॉ.माने म्हणाले,ज्या लोकांनी आपले अहित चिंतले, त्यांच्या हिताचा विचार पेरणाऱ्या येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध यांचे विचार ज्यांनी अंगिकारले. त्यात हरी नरके, मनोहर बन्ने आणि शामराव जाधव यांचा समावेश होतो.
डॉ. एन. डी. जत्राटकर म्हणाले, हरी नरके यांच्या सामाजिक चळवळीचा पाया निपाणीच्या परिवर्तनवादी भूमीत १९८४-८५ मध्ये रचला गेला. मनोहर बन्ने यांनी सडेतोड आणि विधायक पत्रकारिता केली. त्यांनी हयातभर इतरांना प्रेरणा दिली.
डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, रानकवी शामराव जाधव यांनी बुदलमुख गावात सिद्धेश्वर मंदिर प्रवेशासाठी लढा दिला. आजन्म त्यांनी समाज हिताचाच विचार केला.
आनंद संकपाळ म्हणाले, हरी नरके, मनोहर बन्ने, शामराव जाधव यांच्या निधनाने निपाणीच्या सामाजिक, साहित्यिक चळवळीची हानी झाली आहे. उमेश शिरगुप्पे यांनी अंकुर कवी, मंडळातर्फे शामराव जाधव यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनावेळच्या आठवणींना उजाळा दिला. संजय कांबळे यांनी, शामराव जाधव यांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह प्रकाशित करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.यावेळी सुनील कांबळे, कबीर वराळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा.शरद कांबळे, अब्दुल मजिद मुल्ला, सुधाकर सोनाळकर, संतोष माने, नवजीवन कांबळे, अशोक साळवी उपस्थित होते. प्रा. नानासाहेब जामदार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta