Wednesday , March 4 2026
Breaking News

स्पीड पोस्टने राखी पोहोचणार भावापर्यंत!

Spread the love

 

भाऊरायाला पाठवा वॉटरप्रूफ पाकिटातून राखी; रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर पोस्टाची ऑनलाईन योजना
निपाणी (वार्ता) : बहीण-भावाचे नाते दृढ करणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन. येत्या बुधवारी (ता.३०) रक्षाबंधन साजरे होणार आहे. त्यापूर्वी दूरवर असलेल्या आपल्या भाऊरायाला वेळेत राखी पोहोचावी, ही प्रत्येक बहिणीची इच्छा असते. यासाठी पोस्ट विभागाने वॉटरप्रूफ पाकिटातून स्पीड पोस्टने राखी पाठविण्याची योजना सुरू केली आहे. यामध्ये बहिणीला ऑनलाईन हवी ती राखी निवडून ती आपल्या भाऊरायाला ताबडतोब पाठविता येणार आहे. या योजनेला निपाणी व परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय पोस्ट विभाग दरवर्षी काही तरी नवीन योजना आणत असते. राख्या पावसात भिजल्याने त्यांचा रंग निघून जातो. ही समस्या टाळण्यासाठी पोस्ट विभागाने खास रक्षाबंधनासाठी वॉटरप्रूफ पाकीट तयार केले आहे. या पाकिटातून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात, त्याचबरोबर विदेशातही बहिणीला आपल्या भावासाठी राखी पाठविता येणार आहे.
वॉटरप्रूफ पाकिटासह राखी तसेच भावासाठी एक संदेशही यामध्ये दिला जाणार आहे. मागील वर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने यावर्षीही पोस्ट विभागाने ही योजना सुरू केली आहे. सध्या नोकरदार महिला वाढल्याने बाजारात जाऊन राखी खरेदी करणे, नंतर त्या पोस्ट कार्यालयात जाऊन पोस्ट करणे यासाठी वेळ नाही. त्यामुळे घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून, महिलांना आपल्या भावासाठी राखी पाठविता येईल. यासाठी १२० रुपये आकारले जाणार आहेत.
www.karnatakapost.gov.in या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती भरावयाची आहे. एकूण ३२ प्रकारच्या राख्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. जे डिझाईन आवडेल ते निवडून त्यानंतर उर्वरित माहिती भरून ती राखी आपल्या भावाला पाठवायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निपाणी विभागात आतापर्यंत याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून स्पीड पोस्टने राखी पोहोचणार असल्याने महिला आपल्या वेळेनुसार राखी पाठवत आहेत.
—————————————————————-
‘कर्नाटक पोस्ट विभागाने रक्षाबंधनानिमित्त ऑनलाईन राखी पाठविण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे महिलांना आपल्याला हवी ती राखी भावाला पाठविता येणार आहे. राखी, वॉटरप्रूफ पाकीट, भावासाठी संदेश असे याचे स्वरुप असून स्पीड पोस्टने काही दिवसांमध्ये राखी भावापर्यंत पोहोचणार आहेत.’
– एम. एम. पाटील, पोस्ट मास्तर निपाणी,

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *