बोरगाव येथील नगरसेवकांचा इशारा; निवडीअभावी शहराचा विकास खुंटला
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायत निवडणूक होऊन येत्या डिसेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगध्यक्षांची निवड झालेली नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. गेल्या दोन वर्षापासून सभागृह मोकळे असून याबाबत शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास सर्व नगरसेवक सामूहिक राजीनामा देणार असल्याचा इशारा गुरुवारी (ता.२४) आयोजित बैठकीत नगरसेवकांनी दिला.
नगरसेवक माणिक कुंभार यांनी, नगरपंचायत निवडणूक होऊन डिसेंबर महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतात. पण अजूनही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड नसल्याने गावच्या विकासात अडचणी येत आहेत. राज्य शासनाकडून नगरपंचायतीस कोट्यावधींचा निधी येत आहे. पण पदाधिकारी नसल्याने निधी वापर विना पडून आहे. तरी शासनाने याबाबत गांभीर्य दखल घेऊन लवकरात लवकर नगराध्यक्ष उपनगराध्य पदाचे आरक्षण जाहीर करून निवड करावी. सर्व नेते, आमदार, खासदार यांनी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकत्रित येऊन राजकारण बाजूला ठेवून शासकीय पातळीवरील अडचणी दूर करावे.
नगरपंचायत निवडणुका वेळी आपण नागरिकांना अनेक आश्वासने दिली आहेत. पण हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
नगरसेविका शोभा हावले यांनी, १८ महिने निवडणूक होऊन गेले. पण अद्यापही नराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड नाही. यामागचे कारण काय? आम्ही लोकप्रतिनिधी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकत्रित आले आहे.पण निधी अभावी सर्व कामे खोळंबली आहेत. प्रशासकीय अधिकार असताना सर्व ठिकाणी कामे करणे अवघड बनले आहे. तात्काळ आरक्षण काढून निवडी कराव्यात अन्यथा आपण सर्व नगरसेवक एकत्र येऊन सामूहिक राजीनामा देणार आहोत. त्याला राज्य सरकार संपूर्णपणे जबाबदार राहील असा इशारा दिला.
याप्रसंगी नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पवार, वर्षा मनगुत्ते, भारती वसवाडे, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, पिंटू कांबळे, अमर शिंगे, रुकसाना अपराज, बाहुबली सोबाने यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta