आयुक्तासह अधिकाऱ्यांची चिखली बंधाऱ्याला भेट : यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम
निपाणी (वार्ता) : दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसामुळे येथील जवाहर तलाव तुडुंब भरून वाहत होता. पहिल्यांदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने जवाहर तलावाने तळ गाठला आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीपासून यमगरणी जॅकवेलद्वारे जव्हार तलावात पाणी उपसा केला जात आहे. तरीही आठवड्यातून केवळ दोन वेळा पाणी पुरविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी नाणीबाई चिखली बंधाऱ्यापासून पाणी योजना राबविण्याबाबत नगरपालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी चिखली बंधाऱ्याची पाहणी केली असून तेथून पाणी उपसा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
वेदगंगा नदीवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील नानीबाई चिखली हा शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्यातून पुढे कर्नाटकाच्या वाट्याचे पाणी सोडले जाते. पण यंदा निपाणीला पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवड्यात सर्वपक्षीय बैठक घेऊन पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली होती. त्यानुसार निपाणी नगरपालिका नानीबाई चिखली येथील बंधाऱ्यातून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी निपाणी शहरासाठी नेण्याची योजना आखत आहे. योजनेचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेतील आयुक्तासह अधिकाऱ्यांनी चिखली बंधाऱ्याला भेट देऊन तेथून निपाणीपर्यंत पाणी कसे आणता येईल त्याबाबतची माहिती जाणून घेतली.
सुमारे ३० वर्षांपूर्वी नानीबाई चिखली बंधारा अस्तित्वात आला आहे. या बंधाऱ्यात काळम्मावाडीचे पाणी अडविल्याने चिखली, कौलगे, बस्तवडे गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी मिळते. याशिवाय काळम्मावाडी प्रकल्पाचे पाणी झालेल्या करारानुसार कर्नाटक राज्याला वापरासाठी दिले जाते. ते पाणी चिखली बंधाऱ्यातून कर्नाटकला सोडले जाते. या पाण्याचा लाभ कर्नाटकातील कुरली, बुदिहाळ, यमगर्णी, जत्राट, भिवशी, नांगनूर, सिदनाळ गावांना होतो. नंतर आता निपाणी नगरपालिका चिखली बंधाऱ्यातून पाणी योजना राबविण्याची योजना आखत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी चिखली बंधाऱ्याला भेट देत कुरली हद्दीत जॅकवेल उभा करण्यासाठी जागेची पाहणी देखील केली आहे. चिखली बंधाऱ्यातून पाणी उपसा करून पाईपलाईनद्वारे यमगर्णी येथील जॅकवेलमध्ये आणायचे. तेच पाणी निपाणी येथील जवाहर तलावात सोडून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
——————————————————————
मानवतेच्या दृष्टिकोनातून दोनदा पाणी
निपाणी शहराला जवाहर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच कर्नाटकच्या हक्काच्या दिलेल्या पाण्यातून यमगर्णी येथून नगरपालिका पाणी उपसा देखील करते. यंदा उन्हाळ्यात वेदगंगा नदी कोरडी पडून शहराला पाणी टंचाई जाणवल्यानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून चिखली बंधाऱ्यातून दोन वेळा पाणी सोडण्यात आले. त्यामुळे निपाणी शहराला दिलासा मिळाला.
——————————————————————–
‘यावर्षी निपाणी आणि परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा जवाहर तलावात पाणीसाठा झालेल्या नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर चिखली बंधारातून कायमस्वरूपी पाणी आणता येईल का? यावर चर्चा झाली. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी आपण चिखली बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन फक्त पाहणी केली आहे.’
-जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta