१६ सप्टेंबरला मतदानासह मतमोजणी; निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष
निपाणी (वार्ता) : येथील श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला नुकताच मल्टीस्टेटचा दर्जा प्राप्त झाला आहे. बंद पडण्याच्या अवस्थेत आलेला हा कारखाना खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या पाठबळातून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून निवडणूक अधिकारी म्हणून साखर महासंघाचे निवृत्त संयुक्त निबंधक अशोक मोरब यांची नियुक्ती करण्यात आली आह. कारखान्याची निवडणूक १६ सप्टेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी मतमोजणी नंतर वार्षिक सभा होणार आहे.
कारखान्याचे नुकतेच ८ हजार ५०० प्रति दिवस गाळपक्षमता वाढवताना विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर १.५ लाख लिटर क्षमतेची डिस्टिलरी देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. कारखान्याने प्रगतीची दिशा धरताना कर्मचाऱ्यांना देखील कायम करताना नियमित वेतन दिले आहे. वाढीव वेतनाचा लाभ देखील कामगारांना प्राप्त करून दिला आहे. ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना उसाचे बिल नियमित दिले आहे. कारखाना सध्याविकासाकडे वाटचाल करताना अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कारखान्याचे वाढीव विस्तारीकरण करण्याचा मनोदय देखील व्यक्त करण्यात आला आहे.
१६ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ४ सप्टेंबरपासून संचालक पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने संचालकांची संख्या २० झाली आहे. त्यामध्ये सामान्य वर्गातून १५, अनुसूचित जाती जमातीमधून १, महिला वर्गातून २, इतर मागासवर्गातून १ तर ब गटातून १ अशी विभागणी करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दिलीआहे. ७ रोजी सकाळी ११ वाजता कारखानास्थळी अर्जांची छाननी होणार आहे. त्याचदिवशी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. ८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी मुदत दिली गेली आहे. सायंकाळी ५ नंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
१६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत कारखाना आवारात मतदान होणार आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीनंतर निकालाची घोषणा वार्षिक सभेत जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी अशोक मोरब यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta