कोणत्याही लढ्यासाठी तयार
निपाणी (वार्ता) : सुळकुड येथील दूधगंगेतील पाणी इचलकरंजी शहराला देण्याची मागणी होत आहे. या योजने संदर्भात दूधगंगा बचाव कृती समिती जो निर्णय घेईल, त्याला आपण बांधील आहोत. या पाण्यावर कर्नाटक सीमा भागातील अनेक गावे अवलंबून आहेत. सदरचे पाणी इचलकरंजीला दिल्यास या भागातील पिण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. ही बाब लक्षात घेऊन दूधगंगा बचाव कृती समितीचे कार्य सुरू आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राची या बाबत कोल्हापूरला बैठक झाली. या बैठकीला आपण उपस्थित राहणार होतो, पण आपण मुंबईत असल्याने ते शक्य झाले नाही. तरीही समितीच्या पाठीशी आपण कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, दूधगंगेमुळे निपाणी तालुक्यातील सीमा भागातील अनेक गावांना पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे सदरचे पाणी इचलकरंजीला देणे कठीण याबाबत दूधगंगा बचाव कृती समिती या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहे. आपणही समितीच्या विचाराशी ठाम आहोत. समितीमार्फत होणाऱ्या लढ्याला आपणासही परिसरातील गावातील नागरिकांचा पाठिंबा आहे.यासाठी या भागातील शेतकऱ्यांचे पूर्वीपासून पाठबळ असल्याचे सांगितले.
चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, निपाणी भागासाठी मुळातच पाणीटंचाई जाणवत आली आहे. असे असताना सुळकुड येथील दूधगंगा योजनेअंतर्गत इतर शहरांना पाणी दिल्यास भविष्यात मोठी पाणी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दूधगंगा बचाव कृती समिती लढ्याला आपला कायम पाठिंबा राहणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta