कोगनोळी : येथील मुख्य रस्त्यावरील अंबिका पतसंस्थेसमोर गेल्या कित्येक महिन्यापासून गटार तुंबली होती. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. तसेच गटारीवर गवत व झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तसेच गटारी तुंबल्याने डासांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुख्य रस्त्यावर व्यापार्यांची दुकाने आहेत. त्यामुळे या घाणीचा व डासांचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत होता. ही बाब वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर या रस्त्यावर राहणारे व्यापारी उमेश प्रभाकर सोळांकूरे यांनी आपल्या स्वखर्चातून सफाई कामगार लावून गटारीची स्वच्छता केली. त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
काही दिवसापूर्वीही व्यापार्यांनीही ग्रामपंचायतीची वाट न बघता आपापल्या दुकानासमोरील असलेल्या गटारी स्वखर्चाने स्वच्छ करुन घेतल्या. गटारी स्वच्छ न केल्यामुळे साथीचे आजार उदभवण्याची शक्यता होती. पण ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याचे सबब सांगून चालढकल करण्यात येत होती. अखेर याचा त्रास आपल्यालाच सहन करावा लागत असल्याने सोळांकूरे कुटुंबीयांनी स्वखर्चाने गटार स्वच्छ करुन घेतली. यामुळे कोगनोळी ग्रामपंचायत म्हणजे असून खोळंबा नसून अडचण अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta