Tuesday , June 25 2024
Breaking News

निपाणी तालुक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान : कडक सुरक्षा बंदोबस्त

Spread the love

निपाणी : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शुक्रवारी (ता. 10) उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले. नगरपालिका वगळता निपाणी तालुक्यात प्रत्येक गावात अत्यंत कमी ग्रामपंचायत सदस्य असल्याने शांततेत मतदान पार पडले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
निपाणी नगरपालिकेसह निपाणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय, नगर पंचायत कार्यालय ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या नगरसेवक व नगरसेविका यांनी आपल्या पसंतीचे पहिले मत नंतरचे एक मत असा दोन मताचा अधिकार बजावला.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते मतदान केंद्रापर्यंत प्रत्यक्ष मतदानास जाईपर्यंत सर्व महिला व पुरुष सदस्यांना मत कसे टाकावयाचे हे अधिकारी व निष्ठावंत उमेदवारांचे कार्यकर्ते सांगत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी निवडणूक झाली. मात्र इतर निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पेक्षा या निवडणुकीची पद्धत एकदम भिन्न होती. मतदानाचा हक्क बजावताना प्राधान्य मता सह अन्य क्रमवारीची मते देण्यास मुभा होती. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य साठी ही मतदान प्रक्रिया नवीन होती. त्यांच्याकडून चुका झाल्यास मते अवैध ठरण्याची भीतीही व्यक्त होत होती.
बेळगाव जिल्ह्याचा विचार करता एकूण सहा उमेदवार जरी रिंगणात असले तरी सरळ सरळ जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत अनुभवास मिळाली. भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांना पक्षातर्फे उमेदवारी मिळाली होती.
काँग्रेस पक्षातर्फे चन्नरज हट्टीहोळी यांना तर अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी निवडणूक रिंगणात होते. लखन यांच्या एन्ट्रीमुळे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना निवडणूक जड जाणार असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे बनले.
सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षसह सत्ताधारी गटाच्या सर्व नगरसेवकांना एकत्रित आणून मतदान केले.
खासदार जोल्ले यांनी चिक्कोडी येथे तर मंत्री शशिकला जोल्ले यांनी निपाणी येथे मतदान केले. त्यानंतर लागलीच विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांना एकत्र आणून मतदान केले. तर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत निपाणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गटानुसार ग्रामपंचायत सदस्य येऊन मतदान करत होते.
निपाणी तालुक्यात भारतीय जनता पार्टीतर्फे धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सर्व मतदार संघातील ग्रामपंचायती पिंजून काढून विकासाच्या जोरावरच मत मागितले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जरी आपली आत्ता सत्ता नसली तरी सत्ता असतानाची व सत्ता नसताना देखील केलेल्या कामाची पोचपावती मतदार राजापर्यंत घेऊन केले.
तर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ युवा नेते उत्तम पाटील यांनी मागील ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्मूला राबवत दोन्ही राष्ट्रीय पक्षांना या निवडणुकीसह पुढील होणार्‍या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे नक्की जाणवुन दिले. या विधान परिषद निकालावरून निपाणीतील राजकारणात देखील या अनेक स्थित्यंतरे घडण्याची भाकीत वर्तविली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणीतर्फे संभाजीनगर परिसरात वृक्षारोपण

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुख कार्यकर्ते व धर्मवीर छत्रपती संभाजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *