Wednesday , October 16 2024
Breaking News

यंदाही नाही जनगणनेचा मुहूर्त!

Spread the love

कोरोना महामारीने शिरगणतीत अडथळे : आता नवीन वर्षाची प्रतीक्षा
निपाणी : देशपातळीवर जातीय जनगणना करण्यास मोदी सरकार चालढकल करीत असल्याने वाद निर्माण झालेला आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना अद्यापही होऊ शकलेली नाही. याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नसून सलग दुसर्‍या वर्षी जनगणना होणार नसल्याचे चित्र निपाणी तालुक्यात दिसत आहे.
2021 मध्ये जनगणना जाहीर होणे अपेक्षित होते. कोरोनामुळे मागील वर्षी जनगणना झाली नाही. दरम्यान केंद्राच्या रजिस्ट्रार कार्यालयाने जिल्हा, तालुका, शहर, गावांच्या प्रशासकीय सीमेत 30 जूनपर्यंत बदल न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत ही सीमा कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे यावर्षी याचे काम सुरू होण्याचा शक्यता वर्तविण्यात येत होती. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी अद्याप कोणत्याही सूचना केंद्राकडून नाहीत. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येच्या आधारे निधीची तरतूद केंद्र व राज्याकडून अर्थसंकल्पात करण्यात येते. जनगणना न झाल्याने या वर्गासाठी 2011 च्या आधारेच निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. राज्य सरकारने महानगर पालिका, नगरपालिका व जिल्हा पंचायत मधील सदस्य संख्या वाढविण्यासाठी कायद्यात बदल केला. परंतु त्यासाठी लोकसंख्येचा आधार घेतला आहे. जनगणने अभावी ही संख्या वाढविण्यावर निर्बंध आले आहेत.
जनगणनेसाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येते. पण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही लाट न आल्यास त्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

ओबीसींची जनगणना नाही
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी ओबीसींचा डेटा सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ओबीसींची जातिनिहाय गणना करण्याची मागणी जोर धरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. 2011 ला सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती घेण्यात आली होती. परंतु ती सार्वजनिक करण्यात आली नाही. आता जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र गणना करण्याची मागणी होत आहे. परंतु केंद्र सरकारने ओबीसींची स्वतंत्र गणना होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्राच्या रजिस्ट्रार कार्यालयाकडून जनगणनेबाबत एक अर्ज नमुनाही तयार केला असून संकेत स्थळावर उपलब्ध आहे. यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील नागरिकांची नोंद ठेवण्याचा कॉलम आहे. इतर जातींचा समावेश नाही. त्यामुळे ओबीसींची गणना होणार नसल्याचे स्पष्ट आहे.
—-
’गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे या काळात जनगणना होणे अपेक्षित होते. पण आता कोरोना चा नवीन व्हायरस आल्याने अडचणीत भर पडली आहे अजूनही जिल्हाधिकार्‍यांकडून जनगणने बाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही.’
-डॉ. मोहन भस्मे, तहसीलदार, निपाणी.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी

Spread the love  आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *