निपाणी (वार्ता) : सध्याच्या परिस्थितीत अस्मानी संकटामुळे निपाणी शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांना भटकंती करण्यासह पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी निपाणीतील जागृत सर्वपक्षीय निपाणी नागरी न्याय हक्क संरक्षण समितीच्या वतीने सोमवारी (ता.४) सकाळी ११ वाजता निपाणी नगरपालिका प्रशासन, तहसीलदार व निपाणी मंडल पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.
सध्या शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी ४ दिवसातून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. पण ते पाणीही अपुरे पडत आहे.जवाहर तलावात साठलेले पाणी दूषित झालेले असून नदीमधून आठ दिवसातून एकदा पाणी येत आहे. पण नदीतील पाणी संपल्यानंतर सध्याच्या स्थिती पेक्षा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे. प्रशासकीय यंत्रणा व लोक प्रतिनिधींनी आत्तापासूनच योग्य पाणी नियोजन केल्यास भविष्यातील पाणी समस्या गंभीर बनणार नाही. त्यामुळे संबंधितांना निवेदन देवून पाण्यासाठीच्या निपाणीकरांच्या तीव्र भावना कळविण्यात येणार आहेत. यासाठी शहरवासीयांनी उपस्थित राहून या मूलभूत हक्कासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय निपाणी नागरी न्याय हक्क संरक्षण कृती समितीच्या वतीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta