पोलिसांना राख्या बांधून साजरे केले रक्षाबंधन; मॉडर्न इंग्लिश स्कूलचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालय, बसवेश्वर चौक, ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्यात सीपीआय उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांना गोडधोड खायलाही घातले.
बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करणे दुर्मिळच असते. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अहोरात्र राबणारे आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना नेहमीच कार्यरत राहावे लागते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबीयांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सण,वार त्यांना कुटुंबीयांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलिस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत. त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा, अशी संकल्पना मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी मांडली. त्यासाठी विद्यार्थ्यांनीनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतः राख्या बनवल्या. गुरुवारी (ता. ३१) प्राचार्य घाटगे यांनी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांसह मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयासह शहरातील तीनही पोलीस ठाणे गाठले.
यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस बांधवांना बांधल्या. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलिस कर्मचारी आणि अधिकारी भारावले होते. सीपीआय बी.एस. तळवार यांच्यासह उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. याशिवाय पोलिस ठाण्याधील विविध प्रकारच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी सुदर्शन अक्की, श्रीशैल व्होसमणी, आर. एस. लोहार, यासीन कलावंत यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————————–

‘पोलीस कर्मचारी २४ तास सेवा बजावत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ते चोखपणे करत आहेत. कुटुंबांपेक्षाही जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देतात. सण,उ त्सव कुटुंबीयांसमवेत साजरे करता येत नाहीत. समाजाप्रती त्यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन आपण हा उपक्रम राबविला आहे.’
-स्नेहा घाटगे, प्राचार्य, मॉडर्न इंग्लिश स्कूल, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta