नागरी न्याय, हक्क, संरक्षण कृती समिती : आयुक्त, तहसीलदार सीपीआय यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात निपाणी परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. या अस्मानी संकटामुळे शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी, प्रशासनाने येत्या पंधरा दिवसांत तातडीने उपाययोजना सुरू न केल्यास कृती समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण केले जाईल. याशिवाय निपाणी बंद संदर्भात आंदोलनाचे टप्पे आखावे लागतील, अशा आशयाचे निवेदन सोमवारी (ता.४) तहसीलदार मुझफर बळीगार, निपाणी नगरपालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेज्जी आणि मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निपाणी नागरी न्याय, हक्क, संरक्षण कृती समिती तर्फे माजी आमदार काकासाहेब पाटील प्रा.सुभाष जोशी, रयत संघटनेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, सध्या जवाहर तलावात साठलेल पाणी दूषित झाले असून नदीमधून आठदिवसातून एकदा पाणी येत आहे. परंतु नदीतून पाणी संपत्यानंतर पाणीप्रश्न आणखीगंभीर बनणार आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची पभीती निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी आत्तापासूनच पाण्याचे योग्य नियोजन केल्यास भविष्यातील पाणी समस्या गंभीर बनणार नाही.
सध्याच्या परिस्थितीनुसार येत्या दिपावळीच्या सणाला सुद्धा निपाणीकराना अभ्यंगस्नानासाठी पाणी मिळेल की नाही, अशी शंका वाटते. या संदर्भात प्रशासनाने त्वरित हालचाली करून जवाहर तलावातील गाळ ताबडतोब काढला जावा. याशिवाय पूर्वी प्रमाणे दोन दिवसाआड दोनतास पाणी या पद्धतीने शहराला पाणी पुरवठा करण्यात यावा. वेदगंगा नदीमध्ये जॅकवेल शेजारी असणाऱ्या बंधाऱ्यावर आणखी तीन ते चार फूट उंचीचा तात्पुरता बंधारा उभा करून नदीतील पाणी अडवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रा. सुरेश कांबळे यांनी, शहरातील पाणीटंचाई बाबत माहिती सचिन लोकरे यांनी निवेदनाचे वाचन केले. तहसीलदार बळीगार, आयुक्त हुलगेज्जी, सीपीआय तळवार यांनी निवेन स्वीकारून शहरातील पाणीटंचाई बाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून यासंदर्भात उपाय योजना करण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, प्रवीण भाटले, राजेंद्र चव्हाण, डॉ. सी.बी. कुरबेट्टी, निकु पाटील, डॉ. राजेश बनवन्ना, जरारखान पठाण, बोरगावचे पृथ्वीराज अभिनंदन पाटील, वकील अविनाश कट्टी, श्रीमंत दादाराजे देसाई- सरकार प्रा. एन. आय. खोत, किरण कोकरे, बाबासाहेब खांबे,प्रसन्नकुमार गुजर, प्रा. राजन चिकोडे, जयराम मिरजकर, मुन्ना काझी, युवराज पोळ, इमरान मकानदार, शिरीष कमते, कॉम्रेड सी.ए. खराडे, प्रा. कांचन बिरनाळे, फिरोज चाऊस यांच्यासह कृती समितीचे सदस्य नागरिक उपस्थित होते.
—————————————————————-
नगरसेवकांची अनुपस्थिती
गेल्या दोन महिन्यापासून शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्याच्या सोडूनुकीसाठी शहर कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अशा महत्त्वाच्या पाणी प्रश्नाच्या वेळी सर्वच नगरसेवकांची अनुपस्थिती होती. याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू होती.
Belgaum Varta Belgaum Varta