रस्ता कामांची पाहणी; नागरिकांच्या समस्या तशाच
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांची मदत संपल्याने या पालिकेचा पदभार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आहे. पण या शहराकडे ते बऱ्याच महिन्यापासून आलेले नव्हते. मात्र बुधवारी (ता.६) सायंकाळी शहर आणि उपनगरांना भेट दिली. यावेळी त्यांनी नगरोत्थान योजनेच्या चौथ्या टप्प्यात मंजूर झालेल्या निधीतून सुरू असलेल्या रस्ता कामांची पाहणी केली. अचानक रात्रीच्या वेळी येऊन त्यांनी ही पाहणी केली. पण नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
शहरातील जीव हॉस्पिटल ते सेवा रस्ता, सोमनाथ मंदिर ते रामनगरपर्यंत नगरोत्थान योजनेमधून झालेल्या रस्ताकामांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. याशिवाय आंबा मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले फळ भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन तेथील गाळे आणि त्यांची भाडे वसुली याचीही माहिती घेतली. नगरोत्थान कामाची बिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीने निघतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आधी रस्ताकामांची पाहणी करून त्यानंतर बिले काढण्याच्या भूमिकेतून निपाणीत भेट देऊन कामांची पाहाणी केल्याचे नगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
निपाणी शहर आणि उपनगरामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच तीव्र आणि टंचाई जाणवत आहे. शिवाय यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने जवाहर तलावात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनला असून याबाबत नागरिक कृती समितीतर्फे निवेदन ही दिले आहे. पण याबाबत अद्यापही त्यांनी शहराला भेट देऊन समस्येबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील अभियंता पी. जी. शेंदूरे, आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्यासह अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta