बसवजय मृत्युंजय स्वामी; रविवारच्या मोर्चाची तयारी पूर्ण
निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाची आरक्षणाअभावी प्रगती खुंटली आहे. शिक्षण, उद्योग, आणिराजकारणासाठी या समाजाला २-ए आरक्षण मिळावे,यासाठी आतापर्यंत पाच वेळा आंदोलने केली आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी बेळगाव आणि निपाणी भागातील लिंगायत समाजातर्फे निपाणी येथे रविवारी (ता.१०) सकाळी १० वाजता येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनामध्ये सभा घेऊन त्यानंतर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर इस्टलिंग पूजा करून महामार्ग रोखण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून हा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन कुडल संगम येथील पिठाधीश जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी निपाणी येथे आयोजित लिंगायत समाज बांधवांची बैठक आणि भीतीपत्र अनावरण प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी सभापती सुनील पाटील, पुष्कर तारळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वामीजी म्हणाले, २ ए-प्रवर्गामध्ये समावेश होऊन लिंगायत आरक्षण मिळावे. याबाबत नव्या सरकारकडे यांच्याकडे मागणी केली असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील सर्वच गावामध्ये जनजागृती सभा घेतल्या आहेत. त्यामुळे या मोर्चासाठी १५ हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. शिवाय लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा मिळाला आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता येथील बसव सर्कल मध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुचाकी रॅलीला प्रारंभ होणार आहे. येथून महादेव मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर राणी कित्तूर चन्नम्मा पुतळा, बस स्थानकाजवळील धर्मवीर संभाजी महाराज प्रतिमेचे पूजन होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हुतात्मा स्मारकालाही अभिवादन करण्यात येणार आहे.
अक्कोळ रोडवरील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात सकाळी दहा वाजता सभा होणार आहे. तेथून पद यात्रेद्वारे पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बसून इष्टलिंग पूजा व मंत्रोच्चार करत महामार्ग रोखण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये अद्यापही या समाजाला आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे सीमाभागातील महाराष्ट्रातील समाज बांधवांनी ही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्वामीजींनी केले आहे.
प्रारंभी रमेश पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी बसवराज पाटील, व्हनगोंडा पाटील, वीरेंद्र खोत, शिवपुत्र मनगोळी, रवी गुळगुळे, एस. के. पाटील, कुमार पाटील, श्रीशैल इंगळे, लक्ष्मण पाटील, निजलिं भदरगडे, अनिल पाटील, सुरज किल्लेदार, महांतेश पाटील, किरण पांगिरे, राजू कडगावे, जगदीश पाटील, सुधाकर पाटील यांच्यासह लिंगायत समाजाचे पदाधिकारी वसमाजबांधव उपस्थित होते.
——————————————————————–
रुद्र कंकण अभियान
लिंगायत समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर रुद्रकंकण अभियानाचा प्रारंभ स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रत्येक समाज बांधवांच्या हातामध्ये रुद्र कंकण बांधून आरक्षण मिळेपर्यंत हे कंकण न काढण्याचे आवाहन करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta